आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:जिल्हा परिषदेच्या बैठकीत जाहीर केलेल्या तीन सभापतींच्या खात्यांत सभेनंतर बदल

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडीची प्रक्रिया गुरुवारी याहामोगी सभागृहात पार पडली. सभापतिपदाच्या खाते निवडीबाबत गोंधळ उडालेला दिसला. कारण सभेेत झालेल्या तीन सभापतींच्या खात्यांची नावे तोंडी जाहीर करण्यात आली. अर्थ व बांधकाम खात्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. सभा संपल्यानंतर पुन्हा नव्याने खात्यांमध्ये बदल करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. हेमलता शितोळे यांना सभेत आरोग्य समिती सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात त्यांना कृषी व पशुसंवर्धन खाते देण्यात आले.

सुहास नाईक यांना पशुसंवर्धन जाहीर करतानाच हा विषय अपूर्ण सोडण्यात आला. सभेनंतर त्यांना बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपद देण्यात आले. गणेश पराडके यांना शिक्षण देण्याचे सभेत ठरले, प्रत्यक्षात त्यांना शिक्षणासोबत अर्थ खातेही देण्यात आले. सभेत वेगळे आणि सभा संपल्यानंतर खासगीत चर्चा करून वेगळी खाती देण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच घडला.

जिल्हा परिषदेची सभा अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगीता भरत गावित, समाज कल्याण समितीचे सभापती शंकर गावित, सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गावित व समाजकल्याण सभापतिपद शंकर आमश्या पाडवी यांच्याकडे आधीच देण्यात आले.

त्यानंतर सभेत आरोग्य खाते काँग्रेसच्या हेमलता वळवी यांना तर शिक्षण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विजय पराडके यांना दिल्याची घोषणा करण्यात आली. कृषी व पशुसंवर्धन खाते उपाध्यक्ष सुहास नाईक यांना दिल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र हे खातेवाटपही संभ्रमातच राहिले. बांधकाम व अर्थ या खात्यांबाबत निर्णय बाकी ठेवण्यात आला. सभेनंतर ही खाती देण्यात आली. यापूर्वीही सभापती निवडीच्या वेळेस काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या बैठकीतही नाराजी नाट्य पाहावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

सभेनंतर पुन्हा बदल केल्याची माहिती; विराेधकांकडून मात्र आक्षेप नाही

सभा संपल्यानंतर बांधकाम व आरोग्य ही खाती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांना देण्यात आली. शिक्षण व अर्थ गणेश पराडके यांच्याकडे तर हेमलता शितोळे यांना कृषी पशुसंवर्धन खाते देण्यात आल्याची माहिती समाेर आली. त्याबाबत सभेत अधिकृत घोषणा करण्याच्या हालचाली सुरू असताना बैठकीत वेगळी घोषणा तर बैठक संपल्यानंतर खाती वाटपात केले बदल, असे या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. दरम्यान, या सर्व सावळ्या गोंधळावर विरोधी पक्षाच्या काेणत्याही सदस्याने साधी तक्रार किंवा आक्षेपही नोंदवला नाही.

बातम्या आणखी आहेत...