आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर जल:हर घर जल योजनेत शहराजवळील 4 गावे जोडण्याचा शासनाकडे प्रस्ताव ; वीरचक धरणातून द्यावे लागेल 31 कोटी लिटर अतिरिक्त पाणी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणातील पाणी ‘हर घर जल योजने’तून परिसरातील चार गावांना पुरवण्याचा प्रस्ताव असून यामुळे वीरचक धरणातून वर्षाकाठी ३० कोटी ७७ लाख ९९ हजार ९३७ लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे नंदुरबार शहराला पिण्याचे पाणी पुरेल का? अशी शंका उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे निविदा मंजूर होऊन काम पूर्णत्वास कधी येते, याकडे शहरानजीक असलेल्या व सतत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणाऱ्या चार गावांच्या रहिवाशांचे लक्ष लागले आहे. नंदुरबार शहराला वीरचक धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. प्रति माणूस ५५ लिटर पाणी याप्रमाणे एक दिवसाआड १ कोटी लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहरातील १ लाख ५० हजार लोकसंख्येला दरवर्षी १८२ कोटींच्या आसपास पाणीपुरवठा केला जातो. केंद्र शासनाच्या हर घर जल योजनेत आता दुधाळे, होळ तर्फे हवेली, पातोंडा व वाघोदा ही शहराच्या नजीक असलेली गावे जोडली जतील. त्यात दुधाळे गावातील १ हजार ९४७ घरे, होळ तर्फे हवेली गावातील १ हजार ६९५, पातोंडा गावातील १ हजार ४५३ व वाघोदा गावातील १ हजार ३८ घरांना अर्थात ६ हजार १३३ घरांना योजना पोहोचेल

वीरचक धरणात ४० टक्के पाणी साठा असला तरी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा होतो. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने नाईलाजाने दोन महिने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला. आता हर घर जल योजनेत चार गावे जोडली जाणार असल्याने वीरचक धरणाचे पाणी शहराला पुरणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच ८ ते १० दिवसांत या योजनेची निविदा पास होणार असून वीरचक धरणातून या गावांना पाइपलाइनद्वारेच पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव आहे. काम किचकट असल्याने ही योजना दोन वर्षात पूर्ण होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यात दुधाळ्याची लोकसंख्या ९ हजार ७३५, होळ तर्फे हवेली ८ हजार ४७५, पातोंडा ७ हजार २६५ तर वाघोद्याचे ५ हजार १९० नागरिक या योजनेशी जोडले जाणार आहेत. अर्थात ३० हजार ६६५ नागरिकांना एक दिवसाआड अतिरिक्त पाणी पालिकेला द्यावे लागणार आहे. या प्रमाणे ३० हजार ६६५ नागरिकांना एक दिवसाआड १६ लाख ८६ हजार ५७५ लिटर पाणी लागणार असून वर्षाकाठी ३० कोटी ७७ लाख ९९ हजार ९३७ लिटर एवढे पाणी पुरवावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...