आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘हर घर जल’ या संकल्पनेतून जल जीवन मिशनच्या माध्यामातून गावागावातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी पाणी पोहोचवण्याचा मानस आहे. तसेच आगामी ३० वर्षांतील लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली.
शनिवारी ते केंद्र सरकार व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केलेल्या जिल्ह्यातील मंजूर योजनांच्या तालुक्यातील दुधाळे येथील भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, नंदुरबार एमजीपी योजनेचे अधिकारी निकुंभेयांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
५५ लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिन याप्रमाणे पुरवण्यात यावे, असे या योजनेचे मानक आहेत. त्या प्रमाणे २०२४ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. योजना पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालवल्यास, देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने केल्यास ग्रामपंचायतीला योजनेच्या एकूण खर्चाच्या १० टक्के रक्कम प्रोत्साहन बक्षीस म्हणून देण्याची यात तरतूद आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आदिवासी पाडे, शाळांनाही नळजाेडणीसाठी प्रयत्न : जि.प. अध्यक्ष डाॅ.सुप्रिया गावित
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या, प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्व काळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा गाभा आहे. २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन, पाणीपुरवठा करणे. यानुसार आदिवासी पाडे, शाळा, अंगणवाडी, वसतिगृहे आदी ठिकाणीही नळ जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.