आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोजदान या गावात परंपरेनुसार “गेर डिंडन” (याहा डिंडन) नृत्याला १८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षी होलिकात्सवात करण्यात येणाऱ्या या गेर डिंडन नृत्यात मोठ्या संख्येने युवक सहभागी होतात. सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या गावांमध्ये गेर डिंडन नृत्य मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. या नृत्याचे कार्यक्रम होळीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे धूलिवंदनापासून आयोजित करण्यात येतात. धूलिवंदनाच्या दिवशी सोजदान येथून सुरुवात होऊन परिसरातील कोणत्या गावात गेर (डिंडन) नृत्य होणार याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सोजदान येथे पुजारा म्हणून प्रेमराज जगन वर्ती, गेमू सुरजा पाडवी, बासरीवादक लालसिंग राया पाडवी, रेसा पाडवी, मांडूलवादक म्हणून जयसिंग वळवी, नगारावादक रामसिंग नावल्या पाडवी, जवरसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गेर डिंडन नृत्य सुरू आहे. अलिविहीर गावाचे कारभारी उमेदसिंग बटेसिंग पाडवी, जगतसिंग गटवरसिंग पाडवी, प्रेमराज सुमेरसिंग पाडवी हे दरवर्षी नृत्याचे आयोजन करतात. या वर्षी या कार्यक्रमाला भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी आदी उपस्थित हेते.
या गावात नृत्याचे आयोजन
२० मार्च मौलीपाडा (ता.अक्कलकुवा ), २१ मार्च रतनपाडा (ता.तळोदा ), २२ मार्च नाला (ता.अक्कलकुवा), २३ मार्च रामपूर, २४ मार्च मोदलपाडा, २५ मार्च शिर्वे (ता.तळोदा), २६ मार्च गणेश बुधावल.
यांनी सुरू केली परंपरा :
सातपुड्याला लागूनच असलेल्या अलिविहीर (सोजदान) येथील लोकप्रिय गेर डिंडनला १९५१- ५२ मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरुवात केली होती. ही परंपरा त्यांचा नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे नेत आहेत. नृत्यास येणाऱ्या व्यक्तीचा धोती आणि पगडी, पातळ असा पेहराव असतो. हातात दिंडन घेऊन नृत्य करतात.
कठोर नियमांचे होतेय पालन
नृत्यात सहभागी झालेले ज्या गावात नृत्य असेल तेथेच मुक्काम करतात. या काळात ते अंघोळ करत नाही. पायात चप्पल घालत नाही. सोजडान येथे होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र जमणारे गावाचे कारभारी, प्रमुख आपापल्या गावांचे निमंत्रण दिंडन नृत्याच्या पथकाला देतात, अशी माहिती देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.