आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जल जीवन मिशन योजनेच्या जाचक अटी विशेष बाब म्हणून शिथिल करा; अन्यथा मोजक्या ठेकेदारांचे उखळ पांढरे होणार

नंदुरबार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की प्रत्येक घरात नळाद्वारे शुध्द पाणी मिळाले पाहिजे. एकही घर जल विना सुटू नये. तर दुसरीकडे हर घर जल योजनेत प्रचंड जाचक अटी आहेत. या अटी शिथील केल्या नाहीत तर या योजना ठराविक ठेकेदारांच्या खिशात जातील. त्यामुळे योजना राबवतांना विशेष बाब म्हणून जल मिशनच्या अटींमध्ये शिथीलता आणावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली.

जिल्हा परिषदेची सभा बुधवारी पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. सीमा वळवी होत्या. सभेला उपाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, कृषी सभापती गणेश पराडके, शिक्षण सभापती अजित नाईक, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदी मान्यवरांसह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

घरकुल योजनेतील भ्रष्टाचार थांबवा
देवमन पवार म्हणाले, वाघाळे येथील जल जीवन योजना तत्काळ कार्यान्वित व्हावी. दीपक नाईक म्हणाले, घरकुल योजनेत भ्रष्टाचार सुरू असून दोषीवर कारवाई व्हावी. भरत गावित, देवमन पवार, हेमलता शितोळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

घरकूल योजनेचे प्रस्ताव मंजूर करा : ऐश्वर्या रावल म्हणाल्या, शहादा तालुक्यात घरकुल योजना नामंजूर केल्या आहेत. सोनवद गावातील १५० प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. रतन गावित म्हणाले, विहिरींच्या प्रस्तावाला मंजूरी तत्काळ मिळाली पाहिजे. सध्या उन्हाळा सुरू असून यानंतर उशीर होईल.

जल जीवन मिशन नेमके कुणासाठी?
प्रताप वसावे म्हणाले, जल जीवन मिशन नेमकी कुणासाठी आहे हेच कळत नाही? जाचक अटी नियमांमुळे सामान्य ठेकेदार काम करूच शकत नाही. मग ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे, हाच या योजनेचा हेतू आहे का? यास अनेकांनी सहमती देत दुजारा दिला.

बातम्या आणखी आहेत...