आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या गाळप हंगाम सुरू झाला असून नंदुरबार ते शहादा या रस्त्यावर मोठया प्रमाणावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर, बैलगाडयांची वाहतूक सुरू झाली आहे. कोळदा खेतिया रस्त्याचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी या भागात गोमाई पुलाजवळ, प्रकाशा पुलाजवळ रस्ते खराब आहेत. याच भागात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. या खराब रस्त्यावरून वाहतूक करणे जिकरीचे होत आहे. त्यात ऊसाने भरलेल्या ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडयांना रिफ्लेक्टर लावणे गरजेचे असून उपप्रादेशिक परिवहन विभागाने तशा सूचनाही दिल्यात. परंतु याबाबत नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे आयान तसेच शहादा तालुक्यातील पुरूषोत्तम नगरात सातपुडा साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने या भागात दररोज मोठया प्रमाणात ऊस वाहतूक हाेत आहे. गरजेपेक्षा अधिक ऊसाचा लोड ट्रॅक्टरमध्ये भरला जात असल्याने ट्रॅक्टर कलंडण्याची होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच या मार्गावर ट्रॅक्टर पलटी झाला. तसेच गेल्या वर्षी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उभा राहून पुलावर सर्कस करीत रस्त्यावर चालवल्याचा प्रकार प्रसार माध्यमांनी समोर आणला. या भागात रात्रीच्या अंधारात अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे बैलगाडयांसह ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावून अपघात टाळावेत.
ऊस वाहतुकीचे असे आहेत महत्वाचे नियम
कारखान्याचे ट्रॅक्टर ट्रॉलीवर ओव्हर लोड ऊस वाहतूक करू नये, बैलांच्या शिंगाना तसेच बैलगाडीच्या मागे फलक लावून त्यावर रिफ्लेक्टर लावावे. वाहने साखर कारखान्याबाहेर उभी करू नयेत. प्रत्येक चालकाकडे परवाना हवा.
परिवहन अधिकाऱ्यांकडून सूचना
साखर कारखाना प्रशासनानेही वाहन चालकांना या नियमांचे पालन करण्याच्या सूचना कराव्यात, अशा सूचना परिवहन अधिकाऱ्यांनी बैठकीत केल्यात. आयन, सातपुडा, श्रीकृष्ण खांडसरीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यात अमितकुामार सावंत, हेमेश कलाल, अरविंद पाटील, प्रशांत बडगुजर, व्दारकाधीश युनिटचे एस. ए. देसाई, एस. डी. गांगुर्डे उपस्थित हाेते.
उल्लंघन केल्यास कारवाई करणार
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सूचना करण्यासाठी कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. या वेळी अधिकारी किरण बिडकर यांनी विविध सूचना केल्या. तसेच अपघाताची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
उत्तम जाधव, सहा. अधिकारी, आरटीओ, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.