आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळा सुरू होताच धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील दोन मोठ्या नद्या व नाले कोरडे पडल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते. त्यामुळे आतापासून नियोजन करावे. तीन वर्षांपासून या दाेन्ही तालुक्यात एकही हातपंप मंजूर झालेला नाही. दुर्गम भागात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे.
किती डॉक्टर सेवा देतात, असा प्रश्न उपस्थित करत आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी जि.प. स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. स्थायी समितीची बैठक जि.प. अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती हेमलता शितोळे, गणेश पराडके, शंकर पाडवी, संगीता गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते. बैठक सिंचन, आरोग्य तसेच शिक्षण विषयावर चर्चा झाली. मात्र सभेत नेहमीप्रमाणे खडाजंगी बैठकीत दिसली नाही. सदस्यांनी शांतपणे आपले म्हणणे मांडले. सदस्य रतन पाडवी म्हणाले, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल. कुंडल व उदय या नद्या व छोटे-माेठे नाले आटले आहेत. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. बाहेरून अनेक डॉक्टर येतात. नियुक्त झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर निघून जातात. ते पुन्हा येत नाहीत. या परिस्थितीवर ठोस उपाययोजना करावी, असा मुद्दा मांडला. नवापूर तालुक्यातील खोल विहीर ग्रा.पं.च्या आमसर पाड्याचे विभाजन झाले. त्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच ठेकेदारांचे बिले वेळेवर निघत नाहीत, यावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.
दाेन राखीव सुट्या देण्याची मुभा
कोकणात गणपती उत्सवात सुट्या दिल्या जातात. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असल्याने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा हाेताे. त्यासाठी दोन ऐवजी पाच दिवसांची सुटी देण्याची मागणी सी.के. पाडवींनी केली. मार्च महिन्यात सहा व सात रोजी सुट्या असून ५ मार्च रोजी रविवार येत असल्याने आदिवासी बांधवांना सलग तीन दिवस सुट्या मिळतील. जि.प.कडे दोन सुट्या राखीव असल्याने शाळा त्या वाढीव दोन दिवस सुट्या देऊ शकतात. मात्र ही सुटी ऐच्छिक ठेवण्यात आली.
हाेळीसाठी सर्व तालुक्यांंंना सुटी द्या
होळी सणात युवकांचा मोठा सहभाग असतो. होळी सणावेळी युवकांना चेहरा सजवून होळी नृत्यांमध्ये सहभागी व्हावे लागते. रात्रभर नृत्य केल्याने दुसऱ्या दिवशी थकवा येतो. तसेच होळीची तयारी करण्यासाठी काही दिवस जावे लागते. त्यामुळे होळी सणाला सलग पाच दिवस सुटी द्यावी. तसेच हा नियम सर्व सहा तालुक्यांना लागू व्हावा, तसेच होळी उत्सवासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी या बैठकीत चर्चेवेळी करण्यात आली.
पदाेन्नतीची प्रक्रिया मार्गी लावा
शिक्षण सेवकावरून नियमित शिक्षक झालेल्यांचे वेतन नियमित होत नाही. त्यांना नियमित वेतन देण्याचीही मागणी झाली. तर प्राथमिक शिक्षकांना पदाेन्नती कधी देणार आहात? असा प्रश्न उपाध्यक्ष नाईक यांनी विचारला असता यादी सामान्य प्रशासन विभागाकडून येईल. सेवा ज्येष्ठतेनुसार लवकरच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.
आराेग्य विभागाची रिक्त पदे भरा
आरोग्य विभागाचे तीन तेरा वाजले आहेत. डॉक्टर ओपीडीला हजर राहत नाहीत. उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यावर ते मिटिंगला गेल्याचे उत्तर मिळते. डॉक्टरांच्या महिन्यातून दोनच मिटिंगा असतात. मग प्रत्येक वेळेस मिटिंगला गेल्याचे ठरलेले उत्तर का दिले जाते? याची चौकशी करणार की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आरोग्य विभागात जवळपास २० पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.