आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील काही गावात वन जमिनीमुळे तर काही गाव नॉन प्लॅनमध्ये येत असल्याने या ठिकाणी रस्त्यांची कामे झालेली नाही. त्यामुळे दुर्गम भागातील रस्त्यांची कामे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत करावी, अशी मागणी होते आहे.
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अद्यापही अनेक घटकांना न्याय मिळालेला नाही. कोणत्याही भागाचा विकास होण्यासाठी त्या गाव, पाड्यात रस्ता असणे अपेक्षित असते. तरच भौतिक सुविधांसह आरोग्य व शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळतात. तसे झाल्यास विकासाचा मुख्य प्रवाहात दुर्गम भागातील आदिवासी बांधव येऊ शकतात. तळोदा तालुक्यातील रस्त्याची स्थिती पूर्वीपेक्षा समाधानकारक असली तरी तालुक्यातील अक्राणी, केलीपाणी, बेडवई, वेरीमाळ, सिंधवाईपाडा, रावळापाणी, घोडमार्ग या ठिकाणी जाण्यासाठी आजही रस्ते नाहीत. या भागातील रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. रस्ता नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्य डोक्यावर घेऊन जावे लागते. नागरिकांना शेतीचे साहित्य, खते व बियाणे, घर बांधकामासाठी लागणारे साहित्य डोक्यावरच चढवून खडतर पायवाटेने डोंगर माथ्यावरून न्यावे लागत आहे. दरम्यान या भागात कोणाचा विवाह सोहळा असल्यास लग्नमंडप व इतर साहित्य हे डोक्यावर वाहून नेण्याची वेळ येते. कोणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेताना तारेवरची कसरत होते.
पाण्यासाठी गाढवाची मदत
तीन वर्षांपूर्वी काही भागात उन्हाळ्यात पाणी नसल्याने गाढवाच्या पाठीवर पाणी न्यावे लागल होते. त्यामागे रस्ता नसणे हे एकच मुख्य कारण होते. रस्ता नसल्याने कूपनलिका करण्यासाठी आवश्यक साहित्य नेणे अवघड होते. साहित्य नेण्यासाठी गाढवाची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत रस्ते करावेत, अशी मागणी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.