आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली या रस्त्याचे काम सुमारे २ वर्षांपासून सुरू आहे. अधूनमधून होणाऱ्या या रस्त्याच्या खडीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत निवासी उप जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वेली, बेडाकुंड, वाडीबार आदी गावातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी किंवा मोलगी येथे येण्या-जाण्यासाठी साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली असा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेली, बेडाकुंड परिसरातील नागरिकांनी नव्याने रस्ता बनवण्याची मागणी केली होती. त्यानुसार सन २०१९/२० या आर्थिक वर्षात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला व प्रत्यक्षात त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र सदर रस्त्याच्या कामाला सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर मातीकाम न करता सरळ सरळ डांबरीकरणावर खडी टाकली व त्यावर रोलरने दबाईचे कामदेखील केले गेले नाही, परिणामी रस्त्यावर टाकलेली खडी ही बाहेर निघून तिचे ढीग तयार झाले आहेत. उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या मोऱ्यांमध्यहीे पाइप टाकलेले नाहीत. ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनदेखील त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पंधरा दिवसांत दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर वेलीचे सरपंच गुमानसिंग तडवी, दिनेश मोग्या तडवी, अशोक बोंडा वळवी, रामसिंग जात्र्या पाडवी, विजय पाडवी, धर्मा बोंडा पाडवी, नरपत सोन्या पाडवी, गुलाबसिंग रतनसिंग वळवी, कालुसिंग वळवी आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.