आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वाघेश्वरी कॉलनी तसेच जुनी भोई गल्लीच्या रस्त्याच्या कामास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली असली तरी केवळ वाघेश्वरी कॉलनीचे टेंडर पास झाले आहे. मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झाली नसून जुन्या भोई गल्लीचे टेंडरही काढण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळा जवळ येऊनही या दोन्ही कामांना मुहूर्त गवसत नसल्याने नागरिकांना अजून किती दिवस या रस्त्यांनी खडतर प्रवास करावा लागेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोनाकाळात पालिकेचे काम दोन वर्षे ठप्प होते. आता कामांना सुरुवात झाली असली तरी जुनी भोई गल्लीच्या रस्ते कामांना सभेने मंजुरी देऊनही कामांना सुरुवात केली नाही. या कामांचे टेंडरच काढलेले नाही. तर वाघेश्वरी कॉलनी रस्त्याचे टेंडर पास झाले आहे. मात्र ठेकेदारांनी या कामाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने काम सुरू झालेले नाही.
अनेक वर्षांपासून जुनी भोई गल्ली आहे दुर्लक्षित
जुन्या भोई गल्लीत नेहमीच गटारीचे पाणी साचलेले असते. तसेच या भागात अधूनमधून पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पुरवठा होतो. गेले अनेक वर्षे हा परिसर पालिकेने दुर्लक्षित केला आहे. रस्ते दुरुस्त झालेले नाहीत. याच भागात दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. मात्र गटारीच्या पाण्याजवळच अनेकांना दुकान थाटावे लागत असल्याने गैरसोय होते. या भागातील रस्ते दुरुस्त करावे, मंजूर झालेल्या कामांची निविदा काढून काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गटार, सांडपाणीचीही सुविधा करावी
जुनी भोई गल्लीचा वॉर्ड हा नेहमीच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा राहिला आहे. त्यामुळे या वॉर्डाच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे.त्यामुळे या परिसरातील गटार, सांडपाण्याची आधी व्यवस्थित सुविधा करावी. त्यानंतरच रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जुन्या भोई गल्लीच्या रस्ते कामासाठी पुन्हा निविदा
जुनी भोई गल्लीचे काम मंजूर झाले आहे. पावसाळ्यात सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. पुन्हा निविदा काढली आहे. तसेच वाघेश्वरी कॉलनीचे काम दोन ठेकेदार करणार होते. आता एकाच ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. लवकरच या भागातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल.
-रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.