आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा:सारंगखेडा यात्राेत्सवाला प्रारंभ; पहिल्याच दिवशी दर्शनास भाविकांची एक कि.मी.रांग

सारंगखेडा/शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री दत्त प्रभूंच्या जयंतीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या यात्राेत्सवास यंदा बुधवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एक लाखापेक्षा जास्त भाविक, भक्तांनी दर्शन घेतले. दरवर्षी १५ लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. मात्र यावर्षी २० लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील, अशी माहिती दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील यांनी दिली. पहिल्याच दिवशी यात्रेत प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.

दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी एक लाखाहून अधिक पर्यटक, भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लागल्या होत्या. श्री दत्त जयंतीदिनी पहाटे ३ वाजेपासून दर्शनासाठी भाविक येथे आले होते. तब्बल एक कि.मी.पेक्षा अधिक लांबीच्या रांगा लागल्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले.

११ किलो केळीची तुला करत फेडला नवस
एकमुखी दत्त प्रभू हे नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत. सारंगखेडा पंचक्रोशीसह देशभरातून भाविक, भक्त नवस फेडण्यासाठी सारंगखेडा येथे येतात. मुलाची प्रकृती सुधारावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील अशोक सोनवणे व त्यांची पत्नी अशा दोघांनी नवस मानला होता. मुलगा अल्पशा आजाराने त्रस्त होता. त्यांनी दत्त प्रभूला नवस केला होता. ताे पूर्ण झाला म्हणून त्यांनी मुलाची ११ किलो केळीशी तुला (वजन) करत हा नवस फेडला. यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. दत्त मंदिरावर अनेक भाविकांनी सत्यनारायणाची पूजा केली.

पहिल्याच दिवशी १११ घाेड्यांची विक्री
सारंगखेडा घोडे बाजारात १५०० पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी एकूण १११ घोड्यांच्या विक्री झाली. त्यातून २७ लाख ७७ हजार रुपयांची उलाढाल झाली. आजपर्यंत १ लाख २५ हजार रुपयांचा सर्वात महागड्या घोड्याची विक्रीची नोंद करण्यात आली. तो घोडा संतोष अप्पा गावडे, रा.जत, जि.सांगली यांनी व्यापारी जमील अहमद अजीज रहमान, रा. रिछा, उत्तर प्रदेश यांच्याकडून खरेदी केला.

घोड्यांचा साज, साहित्य विक्रीतून माेठी उलाढाल
देशातील कानाकोपऱ्यातून घोड्यांचे साज साहित्य विक्री करणारे व्यावसायिक अनेक वर्षांपासून सारंगखेडा घोडे बाजारात येतात. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या व्यावसायिकांना साज-साहित्य विक्रीतून महिनाभरात ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न, नफा मिळताे.

ते घाेड्यांसाठी विविध साहित्य विक्रीसाठी आणतात. त्यात घोड्याची लगाम, घोड्याचा टाचा साफ करायच्या वस्तू, घोड्याचा साज, चामडी म्होरख्या, ब्रायडल, बँडेज पट्टी, पायातील झांझर, लग्नासाठी मथुरा साज, घोड्यावर टाकायची छाप, बग्गीची काठी, टांग्याचा सेट, खोगीर, लग्न वरातीत लागणारे सर्व साहित्य, घोड्याचा गजरा याचा समावेश आहे.

घाेड्याच्या लगामाची किंमत कमीत कमी १०० रुपये तर जास्तीत जास्त ६०० रुपये लावतात. सर्वात जास्त विक्री बग्गीच्या साहित्याची होते. हे साहित्य विशेषत: गुजरातचे घोडे व्यापारी नेतात. लग्नात घोड्यावर नवरदेवाला बसण्यासाठी जीन देखील मिळते. त्याची किंमत कमीतकमी २५०० तर जास्तीत जास्त ६ हजार रुपये इतकी आहे. घोडे बाजारात चार दुकाने गुजरात, तीन दुकाने राजस्थान तर सहा दुकाने उत्तर प्रदेश राज्यातील व्यावसायिकांची असून अशी १३ दुकाने घोडेबाजारात थाटली आहेत.

सारंगखेडा घाेडेबाजार अव्वल
बालपणापासून वडिलांच्या सोबतीने ३२ वर्षे घोड्यांचा साज विक्री करत आहे. आधी अमळनेरपासून बैलगाडीने प्रवास करून येथपर्यंत पोहाेचायचो. एक महिना यात्रेतच मुक्काम करतो. मी पदवीधर युवक आहे. परंतु घोड्यांच्या साज विक्रीतून मला अधिक उत्पन्न मिळते. दरवर्षी सारंगखेडा येथील यात्राेत्सवात न चुकता येतो. देशात अनेक घोडेबाजार भरतात. परंतु सारंगखेडा घोडे बाजारात मला सर्वात जास्त उत्पन्न मिळते. -रविभाई साजवाले, अमळनेर.

बातम्या आणखी आहेत...