आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानर्मदा किनारी असलेल्या धनखेडी ते मणिबेलीच्या चापडीपाडा दरम्यान रस्ताच नसल्याने, ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुका अक्कलकुवा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नंदुरबारला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता उठून १५ किलोमीटरच्या डोंगरवाटा तुडवत जांगठी ५ वाजता पोहाेचून मिळेल त्या खासगी वाहनाने पुढील प्रवास सुरू करतात. एवढेच नाही तर घरी परतण्यासाठी त्यांना दोन दिवस लागतात. रस्त्याबरोबरच पिण्याचे पाणी, विजेची समस्याही पाचवीलाच पुजलेली असल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे आम्हा काय भूषण, अशी म्हणण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर आली आहे. देशभरात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरी होत असतानाच धनखेडी ग्रामस्थ अजूनही मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षाच करीत आहेत. या गावात जाण्यासाठी मोलगी ते पिंपळखुंटा ते जांगठी ते मणिबेली असा रस्ता आहे. पिंपळखुंटापासून पुढे थोडा डांबरी तर काही ठिकाणी तीव्र चढ-उताराचा कच्चा घाटरस्ता आहे. मात्र मणिबेलीच्या चापडीपाडापासून पुढे चापडीपाडा धनखेडी बारीपाडापर्यंत रस्ताच नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांना बाजारहाट किंवा शासकीय कामानिमित्त अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोलगी येथे जाण्यासाठी पहाटे तीन वाजेपासून घराबाहेर निघावे लागते.
तीन वाजेपासून धनखेडीच्या आटलपाडा, बारीपाडा, सिंगल्यापाडा येथील नागरिकांना डोंगरदऱ्यातून चढ-उतारच्या पायवाटेने जांगठीपर्यंत पायी यावे लागते. जांगठी येथे पहाटे पाच वाजेपर्यंत पोहोचल्यावर जांगठी येथून पाच वाजेला अवैध प्रवासी वाहनांवर मोलगीपर्यंत यावे लागते. तेथून मिळेल त्या वाहनाने तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. नित्याचाच हा प्रवास त्यांना करावा लागत आहे.वेळ, श्रम, पैसा खर्ची घालत अनेक हाल अपेष्टा सहन करत धनखेडी परिसरातील ग्रामस्थ जीवन जगत आहे. किमान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तरी रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा मिळतील, अशी आशा ग्रामस्थांना आहे.
रात्री-बेरात्री काढावा लागतो गावचा मार्ग
धनखेडी ग्रामस्थांना येणे थोडे सोपे होते, मात्र घरी जाताना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. शासकीय कार्यालयातील कामे आटोपून घरी परत जाण्यासाठी नंदुरबार किंवा अक्कलकुवा येथून वाहन मिळाले तरी मोलगीहून मणिबेली धनखेडीकडे जाण्यासाठी वाहन मिळेलच याची शाश्वती नाही. नशिबाने वाहन मिळालेच तरी रात्री-बेरात्री डोंगरदऱ्यातून मार्ग काढत जाणे जिकिरीचे असते.
महिला सोबत असल्यास करावा लागतो नातेवाईक, मित्र परिवाराकडे मुक्काम
ग्रामस्थांना अक्कलकुवा, मोलगी किंवा नंदुरबार येथेच कुठे तरी नातेवाईक, मित्र परिवार यांचा ठावठिकाणा शोधून रात्र काढणे परवडते. प्रसंगी महिला सोबत असल्या म्हणजे अडचणीत भर पडते. अशा प्रकारे धनखेडी येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणाहून काम करून गावाकडे जाण्यास दोन दिवस लागतात.
५०० वर लोकसंख्या : विशेष म्हणजे या गावातील अनेक कुटुंबांना सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र अनेक कुटुंबे ही या गावातच वास्तव्यास आहेत. सुमारे ५०० वर लोकसंख्या अजूनही गावात आहे. मात्र त्यांना अनेक यातना भोगून जीवन जगावे लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.