आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरात तेजीचा अंदाज:सोयाबीनच्या दरात आठवडाभरात प्रतिक्विंटल हजाराने वाढ, मागणीच्या तुलनेत आवक कमी

नंदुरबार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी असल्याने आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात ८०० ते १००० रुपयांनी वाढ झाली. आठवड्यात २० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. व्यापारी सोयाबीनचा साठा करण्यात अधिक रस दाखवत आहे. यंदा गेल्या दीड महिन्यात सोयाबीनची २० हजार क्विंटल आवक झाली आहे. अजून दीड महिना सोयाबीनची आवक हाेईल.

यंदा मिरची, मका, सोयाबीनला अधिक मागणी असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मोठया प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ५ हजार रूपये क्विंटल दर असलेल्या सोयाबीनचे भाव ८०० ते १००० रुपयांनी वाढले आहेत. तेल, कॉस्मेटिक, पशुखाद्य बनवण्यासाठी सोयाबीनचा माेठ्या प्रमाणात वापर होतो.

सोयाबीनला ब्राझील व अमेरिका या देशांमधूनही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. विदर्भात अकाेला तसेच मराठवाड्यात लातूर या दोन जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन होते. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात २० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. अजून पुढील दीड महिनाच सोयाबीनचा हंगाम असणार आहे. त्या काळात सोयाबीनची अधिकाधिक आवक होईल, अशी शक्यता नसल्याने व्यापारी सोयाबीनचा साठा करत आहेत.

मागणीच्या तुलनेत साेयाबीनचे उत्पादन कमी
देशामध्ये महाराष्ट्रात शेंग तेलाचा वापर होतो तर अन्य राज्यांत मात्र खोबरेल, पाम, सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. देशभरात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीनचा वापर विविध वस्तू, पदार्थ बनवण्यासाठी देखील माेठ्या प्रमाणात होत असल्याने यंदा जगभरात मागणी वाढली आहे. तर तुलनेने उत्पादन कमी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात भविष्यात तेजी येणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ते सध्या चढ्या भावाने सोयाबीनची खरेदी करून साठा करत असल्याचे जाणकारांचा अंदाज आहे.

व्यापाऱ्यांकडून साेयाबीन खरेदीला प्राधान्य
सोयाबीनचा हंगाम दीड महिन्यापूर्वी सुरू झाला. अजून दीड महिना हंगाम असेल. मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात २० टक्क्यांनी दर वाढले. व्यापारी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करीत आहेत. -योगेश अमृतकर, सचिव, बाजार समिती, नंदुरबार.

बातम्या आणखी आहेत...