आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सहा तर मध्य प्रदेशमध्ये एक अशा सात जीवनशाळा ‘नर्मदा नवनिर्माण अभियाना’ मार्फत चालवल्या जात असून, पाठ्यपुस्तकाच्या ज्ञानासोबतच जीवनाचे ज्ञान देणाऱ्या या शाळांमुळे नर्मदाकाठावरील एक पिढी शिकून पुढे गेली. शासनाचे अनुदान नसलेल्या या सात शाळा दानशूरांच्या निधींवर चालत असून शासकीय, निमशासकीय शाळांपेक्षा या निवासी शाळा अधिक विद्यार्थी प्रिय ठरल्या आहेत. या शाळांमधून आतापर्यंत ७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी साक्षर, सुशिक्षित झाले. यातील अनेक वकील, डॉक्टर, तलाठी, उत्तम खेळाडू, पोलिस या पदांपर्यंत पोहोचले आहेत.
ज्या सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक वातावरणातील ही मुले आहेत त्याच भागातील हे सर्व शिक्षक अल्पश: मानधनावर सेवारत आहेत. इतर शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वसाधारणपणे दिसून येणारी भाषेची आणि आदिवासी-बिगरआदिवासी अशी दरी इथे जाणवतच नाही. शिक्षक मुलांच्या सवयी, आवडीनिवडी, भाषा, जीवन जगण्याची पद्धती यांच्याशी पूर्णपणे परिचित आहेत. त्यामुळेच मुलांना इथे आपलेपणा वाटतो.
१९९२ साली पहिली शाळा सुरू : शिक्षण नसल्याने सरकारी कागदपत्रे, नियम, योजना समजत नाहीत, ही जाणीव आदिवासी बांधवांना होऊ लागली. या जाणिवेतूनच पुढची पिढी साक्षर व्हावी असे वाटू लागले. नर्मदा काठावर एकही शाळा नव्हती. त्यावेळेस नर्मदा धरणग्रस्त समितीमार्फत स्वतःचीच शाळा काढण्याचा निर्णय झाला. १९९२ साली चिमलखेडीत (ता. अक्कलकुवा) पहिली जीवनशाळा सुरू झाली.
७ शाळांमध्ये ८०० आदिवासी मुले-मुली
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात भाबरी, थुवाणी, सवऱ्यादिगर, अक्कलकुवा तालुक्यात- डनेल, मणिबेली, शहादा तालुक्यात जावदेवाडी पुनर्वसन वसाहत आणि मध्य प्रदेशातील खाऱ्याभादल अशा या सात जीवनशाळा चालतात. अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये चालणाऱ्या या ७ शाळांमध्ये ८०० आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या या निवासी शाळा आहेत. अनंत अडचणींना तोंड देऊन मोठ्या कष्टाने या शाळा चालवल्या जात आहेत.
पाठ्यपुस्तकांसोबतच जीवनाचे धडे
सरकारी अभ्यासक्रम पूर्णपणे न नाकारता, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातला समन्वय साधला जायला हवा. या सर्व मूलभूत विचारांसह जीवनशाळेचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी कृष्ण कुमार, अनिल सदगोपालांसारखे शिक्षणतज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभले. यातूनच जीवन शाळा अस्तित्वात आली. यानंतर नंदुरबार जिल्ह्यात सहा व मध्य प्रदेशात एक अशा सात शाळा अस्तित्वात येऊन या सर्व शाळा आता पाठपुस्तकांसोबतच जीवनाचे धडे देण्यात यशस्वी झाले आहेत.
या शाळेचा विद्यार्थी हॉकी चॅम्पियन
जीवन शाळा २६ शिक्षक व २६ कर्मचारी वृंदांमार्फत चालतात. विविध कंपन्या, वैयक्तिक निधीद्वारे शाळांचा खर्च चालवला जातो. खुमान पटले हा विद्यार्थी हॉकी चॅम्पियन झाला. त्याची नुकतीच पोलिस पदाच्या भरतीत निवड झाली आहे.
-लतिका राजपूत, कार्यकर्ती, नर्मदा बचाव आंदोलन, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.