आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासी दुर्गम भागातील बालमृत्यूंच्या समूळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ.गावित बोलत होते. यावेळी दुर्गम भागातील रस्त्यांची कामे, आराेग्य विभागाच्या वाहनांना जीपीएस सिस्टिम बसवण्याचे निर्देशही दिले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, आदिवासी आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ.गावित म्हणाले की, गरोदर मातांच्या अनुदानासाठी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, रेशनकार्ड आदी कामे वेळेवर पूर्ण करुन त्यांना वेळेत अनुदान मिळेल यांची दक्षता घ्यावी. हे कामकाज सर्व यंत्रणांचे जलद व पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने करावे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेच लाभार्थ्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदान वितरणाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या. बैठकीत नवसंजीवनीसह इतर योजनांचा आढावा घेतला.बैठकीत झालेल्या चर्चेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
बालकांना राेज वेगळा आहार द्या
यंत्रणांनी महिन्यातून एकदा बैठका घेवून त्यावर उपाययोजना कराव्यात योग्य समन्वयातून ५० टक्के काम कमी होणार आहे. बालकांच्या पॅकेज फूडमधील आहार रोज एकसारखा न देता आलटून पालटून वेगवेगळा द्यावा, त्यातून बालकांना पोषण आहाराची गोडी लागेल, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले.
आराेग्य विभागाच्या वाहनांवर जीपीएस सिस्टिम बसवा
पहाडी व दुर्गम भागातील प्रत्येक इमारत बांधकामात विद्युतीकरणासोबतच सोलर सिस्टिम अनिवार्यपणे बसवावी. वाड्यापाड्यातील सर्व लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन लिंक करावेत. तसेच या गावांशी धान्य वितरणासाठी संपर्क होवू शकत नाही त्या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्यांची कामे करुन ती गावे रस्त्यांच्या माध्यमातून संपर्कात आणावीत. आरोग्य विभागाच्या सर्व वाहनांवर जीपीएस सिस्टिम बसवण्याच्या सूचनाही यावेळी डॉ.गावीत यांनी संबंधितांना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.