आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिदान दिन विशेष:माझ्या आईच्या नेत्रांनी ती व्यक्ती सुंदर जग पाहू शकते; याचे मूल्य कुठल्याही पैशात मोजता येण्यासारखे नाही

नंदुरबार20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझी आई लौकिक अर्थाने हयात नाही, पण मरणोत्तर केलेल्या तिच्या नेत्र दानामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे येथील एका अंध व्यक्तीला नेत्र मिळाले होते. आता ती व्यक्ती कुठे आहे याची माहिती नाही. पण माझ्या आईच्या डोळ्यांनी ती व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकते, याचे मूल्य जगातील कुठल्याही पैशात करता येणार नाही, अशा शब्दांत नेत्रदानाच्या चळवळीतील एक सदस्य म्हणून श्रीराम दाऊतखाने यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना आपली भावना व्यक्त केली.

५ जुलै २००५ रोजी धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत्ररोपणाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर सहाव्या दिवशीच अर्थात ११ जुलै रोजी श्रीराम दाऊतखाने यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांचे डोळे काढून धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे लागलीच नंदुरबार जिल्ह्यातीलच एका व्यक्तीस ते डोळे दान करण्यात आले. त्या व्यक्तीला जग दिसू लागले.

रंग दिसू लागले. त्याच्या डोळ्यातील हा आनंद कुणीच विसरू शकत नाही. आई अनुराधा दाऊतखाने हयात नाहीत; पण आईचे डोळे कुणाला तरी दान दिल्याचा सार्थ अभिमान आणि आत्मिक समाधान लाभल्याचे दाऊतखाने म्हणाले. नेत्र रुग्णालयातर्फे वयाची अट घालण्यात आली असून एक दिवसाचे शिशू ते ६५ वर्षाच्या आतील कोणीही नेत्रदान करू शकतो. त्यामुळे आता नेत्र दान ही चळवळ झाली पाहिजे. तसे झाले तर अनेक अंध बांधव जग पाहू शकतील, अशी अपेक्षा आहे.

१९ वर्षांत १७५ जणांनी केले नेत्रदान ;वयाच्या अटीमुळे वर्षभरात काहीशी घट
१९९८ ते २०१७ पर्यंत या गेल्या १९ वर्षांत नेत्रदान करणाऱ्यांच्या संख्येने पावणेदोनशेचा पल्ला पार केला आहे. तर एक हजार जणांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञा पत्र लिहून दिले आहे. यासाठी १ जुलै १९९८ रोजी “नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश जैन, सचिव डॉ.अर्जुन लालचंदाणी, सदस्य महादू हिरणवाळे व श्रीराम दाऊतखाने हे कार्यरत आहेत. नेत्रदानासाठी आता वयाची अट असल्याने त्यात गेल्या वर्षभरात घट झाल्याचे दिसून
अाले आहे.

बातम्या आणखी आहेत...