आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबास दिलासा:शिक्षक परिषदेच्या सक्षम पाठपुराव्याला आले यश; मृत शिक्षकाच्या वारसास 10 लाख रुपयांचा अपघाती विमा दावा मंजूर

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात प्रथमच अपघातात मृत्यू झालेल्या प्राथमिक शिक्षकाच्या वारसास राज्य शासकीय कर्मचारी वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या अंतर्गत १० लाखांचा विमा दावा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षक परिषदेने केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील झामट्यावड येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक सीताराम गडबड कोकणी यांचे ६ सप्टेंबर २०१९ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर त्यांच्या नातेवाइकाने राज्य शासकीय कर्मचारी वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत १० लाखांच्या विमा दाव्याची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राज्य विमा संचालनालयाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे केली. दरवर्षी एप्रिल महिन्यात ३५४ रुपये वेतनातून कपात करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा ऐच्छिक अपघात विमा काढला जातो; परंतु दावा मंजूर करताना अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. कै. कोकणींच्या विमा दाव्याबाबत खूपच दिरंगाई झाल्याने संबंधित नातेवाइकाने शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, उपाध्यक्ष राकेश आव्हाड आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांना संपर्क करून माहिती दिली. यावर जिल्हाध्यक्ष चौधरींनी विमा दावा मंजुरीस होणाऱ्या दिरंगाईबद्दल निवेदन देत पाठपुरावा केला. विमा संचालनालयाने शिक्षकाच्या हक्काचे विम्याचे १० लाख सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याचे कळवले. यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. नातेवाईक राधेश्याम कोकणी यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून यासाठी पत्रव्यवहारही केला. सदर पत्रव्यवहार सुरू असताना विमा दावा मंजुरीस दिरंगाई का, याबाबत परिषदेने विमा संचालनालयाचा समाचार घेतला. परिणामी तक्रारीची तत्काळ दखल घेत विमा संचालनालयाने संपूर्ण कार्यवाही अवघ्या एक महिन्यात पूर्ण करून संबंधित शिक्षकाच्या वारसास २६ राेजी १० लाख रुपयांचा विमा दावा मंजूर केला आहे.

कै.कोकणी यांच्या कुटुंबास आधार, समाधान व्यक्त
यापूर्वीही खात्यांतर्गत शिक्षक सीताराम कोकणी यांच्या पत्नी शकुंतला काेकणी यांना १५ लाखांचे सानुग्रह अनुदान शिक्षक परिषदेच्या सहकार्याने प्राप्त झाले होते. प्राथमिक शिक्षक कै.सीताराम कोकणींच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी भरून निघणार नाही; परंतु या आर्थिक मदतीने त्यांना मोठा आधार मिळणार आहे. याबाबत कोकणी परिवाराने शिक्षक परिषदेने केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.