आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरानजीक असलेल्या होळतर्फे हवेली गावातील १६०० घरांना डस्टबिन वाटप करण्यात येत असून त्याचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. तेथील ग्रामपंचायतीने १२ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दोन घंटागाड्या खरेदी केल्या असून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर घरोघर जावून कचरा गोळा करण्याच्या कामाला सुरुवात हाेईल. येत्या दिवाळीपर्यंत ‘हर घर, नल जल’ योजनेचे काम अंतिम टप्प्यात येऊन या भागातील रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. अस्वच्छतेपासून ग्रामस्थांची गुढीपाडव्यापासून मुक्तता होणार असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवाळीत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शहरात नोकरी करणाऱ्या व होळतर्फे हवेलीत राहणाऱ्यांचा संघर्ष संपणार आहे. होळतर्फे हवेली ग्रामपंचायतमार्फत घंटागाडी व कचराकुंडीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. पूर्वी शहरापासून लांब असलेले हे गाव आता शहराला जोडले गेले आहे.
प्रत्यक्षात हे गाव कागदोपत्री ग्रामपंचायत आहे. गावात सुमारे १ हजार ६०० घरे आहेत. गावात कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्ष प्रश्न नागरिकांपुढे उभा होता. अखेर डस्टबिनमध्ये हा कचरा गोळा करून तो कचरा गाडीत टाकायचा. तसेच संकलित केलेला कचरा शहराच्या कचरा डेपोत टाकायचा, असे नियोजन झाले. त्यामुळे या गावातील कचऱ्याची समस्या संपुष्टात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात एखादया ग्रामीण भागात डस्टबिन वाटप तसेच घंटागाडी मार्फत कच-याची विल्हेवाट लावण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन या उपक्रमाला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार असल्याने आणि तो बहुमान होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वच्छता व पाणी प्रश्न सुटल्याने सर्वांनी निश्वास साेडला आहे.
घंटागाडी, कचराकुंडीचे झाले लाेकार्पण
डुबकेश्वर मंदिर परिसरात हा घंटागाडी व कचराकुंडी लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत काही नागरिकांना प्रातिनिधिक स्वरुपात घरात कचरा संकलनासाठी डस्टबिनचे वाटप केले. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक रवींद्र पवार, दीपक दिघे, चेतन वळवी, प्रमोद शेवाळे, हंसराज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव नितीन जगताप, युवा सेना तालुकाप्रमुख प्रफुल खैरनार तसेच होळतर्फे हवेलीचे सरपंच मनीष नाईक, उपसरपंच शोभा रवींद्र पवार, ग्रामसेवक विजय पाटील यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
दिवाळीपासून शुद्ध पाणी देखील मिळेल
हर घर नल जल योजनेचे ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. दिवाळी सणापर्यंत नंदुरबारला जे वीरचक धरणातील जे शुद्ध पाणी पुरवले जाते, तेच पाणी होळतर्फे हवेलीच्या ग्रामस्थांनाही मिळेल. - रवींद्र पवार, माजी उपनगराध्यक्ष, नंदुरबार न.पा.
ग्रामपंचायत हद्दीतील कचरा प्रश्न सुटणार
गुढीपाडव्यापासून घंटा गाडीद्वारे कचरा संकलनास सुरुवात करण्यात येणार आहे. घंटा गाडीद्वारे गावात घरोघरी कचरा गोळा करून पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे होळतर्फे हवेली ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.- शोभा पवार, उपसरंपच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.