आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण:इतिवृत्तात चुकीची नोंद केल्यानेच विहीर चोरीला गेल्याची बदनामी!

नंदूरबार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- ठाणेपाडा येथील आश्रमशाळेतील जागेत विंधन विहिरीची चाचणी केल्यानंतर पाणी न लागल्याने २०२१ मार्चअखेर विहिरीचा निधी परत गेला. निधीच मिळाला नाही अन् विहिर खोदलीच गेली नाही. त्यामुळे विहिर चोरीला जाण्याचा प्रश्न नाही, असा खुलासा मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.

‘विंधन विहीर चाचणी’ ऐवजी इतिवृत्तात ‘विहिरीची चाचणी’ लिहिल्याने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांने इतिवृत्ताच्या आधारे विहिरीला पाणी लागले नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिली होती. यावरूनच विहीर चोरीला गेल्याचा घोळ सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. ठाणेपाडा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी जि.प सदस्य देवमन पवार यांनी विहिरीची मागणी केली. विहिरीला २९ जून २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी मंजूर करण्यात आला. दोन योजनांसाठी ३३ लाख मंजूर झाल्याने प्रत्यक्षात ठाणेपाडा विहिरीला १७ लाख मिळणार होते. सन २०१९,२०२० पर्यंत निधी खर्च करण्याची मुदत होती.

या विहिरीसाठी निविदा काढण्यात आली. निविदा २५ लाखांची होती. तांत्रिक मान्यता ४० लाखांना मिळाली. दोन वेळा विंधन विहिरीची चाचणी घेतली. त्यामुळे पाणीच लागले नाही. दुसऱ्या जागेचा शोध घेण्यात आला. मात्र वनविभागाने उशिराने प्रशासकीय मान्यता दिली. तोपर्यंत निधी खर्च करण्याची मुदतच संपली होती. अखेर विहिरीचा पैसा परत गेला. विंधन विहिरीच्या चाचणीत पाणी लागले नाही, असे इतिवृत्तात लिहिणे आवश्यक असताना विहिरीला पाणी लागले नाही, असे लिहिले गेले.

प्रत्यक्षात विहिरीत कुठलाच गैरव्यवहार नसल्याचे स्पष्ट
विहिरीसाठी निधी मंजूर झाला, विहिरीला पाणी लागले नाही. तसेच विहीर कागदावरच दाखवली गेली. निधी गेला कुठे? असे प्रश्न विचारण्यात येऊन विहीर चोरीला गेली, असा गैरसमज पसरला. केवळ इतिवृत्तात लिहितांना घोळ झाला, यातून जिल्हा परीषदेतील गैरकारभाराची बाब माध्यमातून बाहेर पडली. यामुळे जिल्हा परिषदेची मोठी बदनामी झाली. प्रत्यक्षात विहिरीत कुठलाच गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...