आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘नेमिची येतो पावसाळा, दैना झली पळापळा’, असे म्हणण्याची वेळ यंदाही नंदुरबार शहरातील मंगळबाजारातील व्यापाऱ्यांवर पहिल्याच पावसात आली. जोरदार झालेल्या पहिल्याच पावसांत दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. दरवर्षी पावसाळ्यात हा त्रास असूनही नगरपालिकेकडून ठोस अशी उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.
दर पावसाळ्यात मंगळ बाजारात पाणी साचत असलयाने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून न्यू इंडिया स्टोअरच्या खाली असलेल्या नाल्यात शहरातील वाहून आलेला गाळ अडकताच मंगळबाजार, गणपती मंदिर, मंगलगेट परिसरात मोठया प्रमाणावर पाणी साचून व्यापाऱ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. यंदा पहिल्याच पावसात व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने पावसाच्या हंगामात किती नुकसान होणार, याची भीती व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
नाल्यावरच शॉपिंग कॉम्प्लेक्स : नाल्यावरच शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. नाल्यात कामगार आत जाऊच शकत नाही. त्यामुळे नाला सफाईला मर्यादा येतात. साहजिकच नाले सफाई झाली तरीही नाल्याच्या पुढच्या भागात पाणी साचण्याचे प्रमाण असतेच. त्यामुळे पाणी वाहून नेण्यास मर्यादा येतात. पाण्याचा निचरा झाला तर व्यापारी सुटकेचा निःश्वास सोडतात. मुसळधार पाऊस पडलाच नुकसान टाळू शकत नाही.
असे वाहत येते पाणी : भोई गल्लीचा भाग हा सर्वात खोल आहे. येथून व गवळीवाडयातून पाणी वाहून येते. साधारण पाऊस आला तरी भोईगल्लीला नदीचे स्वरूप प्राप्त होते. हे पाणी नाल्यातून जाते. परंतु मुसळधार पाऊस पडला तर नालाही हे पाणी घेत नाही. मग उर्वरित पाणी हे मंगळबाजार, सरदार सोप फॅक्टरी, गणपती मंदिर चौक या बाजूपर्यंत पसरते. त्यामुळे दुकानात पाणी शिरून मालाचे नुकसान होते.
रस्ता वरती तर दुकाने जमिनीलगत : मंगळबाजारात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवले आहेत. ठेकेदार हे रस्ते बनवताना रस्ते खोदून रस्ता न बनवता, आहे त्या रस्त्यावर सिमेंटचा थर टाकतो. त्यामुळे सिमेंटचा थर साचून रस्ता दिवसेंदिवस उंच होत जावून दुकाने जमिनीच्या तळाशी राहत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात थेट पाणी दुकानात शिरण्याचे प्रकार वाढत आहेत.
गाळामुळे साचते पाणी
मंगळबाजारात रायसिंग पुरा, सुभाष चौक, गवळीवाडा, गणपती मंदिर रोड या भागातील पाणी प्रवाहीत होऊन थांबते. गाळ वाहून आल्यास साचतो. त्यामुळे पाणी प्रवाहित न होता साचते. त्याचा परिणाम मंगळ बाजारातील व्यापाऱ्यांना भोगावा लागतो.
-निनाद असोदेकर, व्यापारी
नालेसफाई होत नाही
अनेक वर्षापासूनची ही समस्या आहे. दरवर्षी गुडघाभर पाणी साचते. पाऊस पडला तरी दुकानात पाणी शिरून माल खराब होतो. नाला साफ करताना तो व्यवस्थित साफ झाला का? हे पाहिले पाहिजे. नाल्याच्या आत सफाई कर्मचारी जावू शकत नाही.
-प्रताप मंगा चौधरी, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.