आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शनासाठी गर्दी:दर्शनासह आरास पाहण्यासाठी नंदुरबार शहरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी भाविकांनी आरास पाहण्यासाठी शहरात गर्दी केली होती. आरास पाहण्यासाठी बहुतांश रस्ते या गर्दीने फुलले होते. शनिवार व रविवार हे दोन दिवस कर्मचाऱ्यांना सुटी होती. त्यामुळे आरास पाहण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. या पुढे प्रत्येक दिवशी आरास व दर्शनासाठी गर्दी हाेईल, अशी अपेक्षा आहे.

३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. पाच दिवसांत उत्सवात प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून आरास पाहण्यासाठी देसाईपुरा, शिवाजी महाराज मार्ग, जळका बाजार, अमर टॉकीज परिसर, उड्डाणपूल परिसरात गणेश मंडळांनी साकारलेल्या आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. १३९ वर्षांच्या मानाच्या श्री दादा गणपतींच्या दर्शनासह आरतीसाठी रोज गर्दी होत आहे. सायंकाळी तर नवसॉ फेडणाऱ्यांची एकच रीघ लागत आहे. श्री दादा गणपतींची आरती झाल्यानंतर बाप्पासाेबत सेल्फी घेण्याचा मोह देखील अनेकांना आवरता येत नसल्याचे चित्र आहे.

देखाव्यांसह विलोभनीय गणेशमूर्तींच्या दर्शनाची आस जळका बाजार परिसरात अमर गणेश मित्र मंडळाच्या वतीने सुबक अशी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विलोभनीय गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांची गर्दी होत आहे. श्री महाराणा प्रताप गणेश मंडळाने यंदा विराट हनुमान दर्शन हा देखावा ठेवला आहे. धार्मिक आरासची परंपरा यंदाही कायम आहे. आरास पाहण्यासाठी भाविक थांबून राहत असल्याने कार्यकर्त्यांसह पोलिसांनाही काळजी घ्यावी लागत आहे. यानंतर मानाचे तात्या गणपती, श्री काका गणपती यांच्या दर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. श्री शक्ती सागर गणेश मित्र मंडळाने श्री गणेशाची उभी मूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

मार्तंड ऋषींची आरास पाहण्यासाठी उसळतेय गर्दी
श्री अंबिका मंडळाने यंदा मच्छिंद्रनाथांचा जन्म ही आरास मांडली आहे. अंबिका मंडळाची आरास पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली आहे. अंबिका मंडळाची आरास ही किशाेरभाई वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. श्री स्वामी विवेकानंद गणेश मित्र मंडळाने तांबोळी गल्लीत सुंदर अशी आरास तयार केली आहे. मार्तंड ऋषींची आरास पाहण्यासाठी भाविकांची तुपबाजार, तांबोळी गल्ली या भागात मोठया संख्येने गर्दी उसळत आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देण्यात आला आहे. होमगार्ड, महिला होमगार्डची देखील नेमणूक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...