आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हगणदारीमुक्ती:जिल्ह्यात यंदा केवळ 12 हजार शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट

नंदुरबार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण स्वच्छता भारत मिशन अंतर्गत २०१२ पासून शौचालयाच्या बांधकामासाठी प्रयत्न करण्यात येत असून, आज अखेर १ लाख ५७ हजार शौचालये बांधण्यात आली आहेत. यंदा केवळ १२ हजार २१ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. शौचालये बांधूनही ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी करणे, हेच प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. तर नागरिकांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा हगणदारीमुक्तीचे स्वप्न अधुरेच राहील.

स्वच्छ भारत मिशनद्वारे गेल्या १० वर्षांपासून शौचालय बांधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याला प्रशासकीयस्तरावर यश मिळताना दिसत आहे. यापूर्वी शौचालयात भ्रष्टाचार झाल्याचे अनेकदा उघड झाले आहे; परंतु शौचालयाचे महत्त्व नागरिकांना कळल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांशी घरात आता शौचालये बांधण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दहा वर्षांत साधारण २ लाख ५७ हजारांपेक्षा अधिक शौचालये बांधून ती त्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. शौचालयाच्या बांधकामाबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी चव्हाट्यावर आल्या होत्या. निकृष्ट पद्धतीने शौचालये बांधकाम, शौचालये बांधूनही ग्रामीण भागात बाहेर शौचास जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत प्रशासनाच्या वतीने नेहमीच जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान, सन २०२०-२१ पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात २ लाख २९ हजार ७८४ शौचालये बांधण्यात आली. यात २ हजार ५१ कुटुंबीय मात्र शौचालयापासून वंचित राहिले. त्यानंतर पुन्हा सर्वे करण्यात आल्यानंतर २७ हजार ३८ घरात शौचालय नसल्याची बाब समोर आली. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यातील २७ हजार ३८ कुटुंबीयांना शौचालये बांधण्यात आली. यंदा १२ हजार २१ कुटुंबीयांना शौचालय देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागात ६ हजार १२३ कुटुंबीयांचा डाटा एन्ट्री करण्यात आली आहे.

पहाडपट्टीत, वाड्या पाड्यांमुळे अडचण
नंदुरबार जिल्हा हा भौगोलिक दृष्टीने पहाड पट्टीत, वाड्या पाड्यात विखुरला आहे. त्यामुळे शौचालय बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल १० वर्षे कालावधी लोटला. शहादा, नंदुरबार तालुक्यात शौचालयापासून अनेक जण वंचित होते. त्या सर्व कुटुंबाकडे शौचालय बांधण्यात आली आहेत.

शौचालय बांधकाम प्रक्रिया सुरूच
स्वच्छता भारत मिशनच्या वतीने कुटुंबीयांना १२ हजारांचे अनुदान देण्यात येते. यात कुटुंबीयांनी स्वत:ची थोडी रक्कम जमा करून अधिक उत्तम दर्जाचे शौचालय तयार करायला हवे. जिल्ह्यात शौचालय बांधकाम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अजूनही प्रक्रिया सुरूच आहे. अनेक जण शौचालय बांधूनही उघड्यावर शौचास जातात. ते टाळले पाहिजे.-रघुनाथ गावडे, सीईओ, जि.प. नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...