आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निरोप:मिरवणुकीत ढाेल-ताशांसह संबळचा वापर, गजराजने वेधले भक्तांचे लक्ष; २८ हून जास्त गणेश मंडळांचा सहभाग

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पहिल्या टप्प्यातील श्रींची विसर्जन मिरवणूक साेमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री १२ वाजेपर्यंत वाजंत्रीला परवानगी देण्यात आली होती. शिवलाल सोनार यांच्या मानाच्या पालखी गणपतीसह २८ हून अधिक गणेशाचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यावेळी गुलालासह इतर रंगांचीही उधळण करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाऽऽ.. पुढच्या वर्षी लवकर याऽऽच्या गजरात श्रींचे विसर्जन करण्यात आले.

१३९ वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील श्री विसर्जन मिरवणुकीला दुपारी प्रारंभ झाला. डीजे वाद्याला फाटा देत नेहमीप्रमाणे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी बाप्पांचे स्वागत झाले. सुभाष चौकात सर्व मंडळ एकत्रित आल्यानंतर एका रांगेत विसर्जन मिरवणूक निघाली. गणपती मंदिराजवळ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, कुणाल वसावे, कैलास पाटील, गजेंद्र शिंपी यांच्यासह कार्यकर्त्यांकडून गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

तीन ठिकाणांवर झाले श्रींचे विसर्जन; बंदाेबस्त तैनात
शहराजवळ असलेल्या शिवण नदी, प्रकाशे येथील तापी पात्रात तसेच हातोडा पूल येथील नदी पात्रात अशी तीन ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पाेनि रवींद्र कळमकर, पाेनि किरणकुमार खेडकर आदींच्या मार्गदर्शनात बंदोबस्त तैनात हाेता.

पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्यांना पहिल्यांदाच चांगला रोजगार
शहरात बाप्पाला निराेप देताना उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. काेराेनामुळे दाेन वर्षे मिरवणुकाच निघाल्या नाही. त्यामुळे वाद्ये वाजवणाऱ्यांना राेजगार मिळाला नाही; परंतु यंदा डीजे डाॅल्बीवर बंदीमुळे पारंपरिक वाद्यांना महत्त्व प्राप्त झाले. ढाेल -ताशांसह संबळचा माेठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे अनेकांना या उत्सवात राेजगार प्राप्त झाला आहे.

कार्यकर्त्यांसह संपूर्ण मिरवणूक मार्गच गुलालाने माखला
शहरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह चाैक गुलालाने माखले हाेते. दाेन वर्षांनी मिरवणूक निघाल्याने गुलालाची माेठी उधळण झाली. गुलालाच्या रिकाम्या पिशव्यांची संख्या ५ हजारांवर गेली हाेती. दरम्यान श्रींच्या विसर्जन साेहळ्यास कुठे गालबाेट लागू नये यासाठी पाेलिस निरीक्षक व सहकारी कर्मचारी यांची दिवसभर शहरात गस्त सुरू हाेती.

बातम्या आणखी आहेत...