आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यमराठी विशेष:राजवाडी होळीसाठी महाराष्ट्रासह तीन राज्यातील पर्यटक, आदिवासी दाखल

काठी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिदुर्गम काठी गावात होळीचा उत्साह द्विगुणित

काठी हे गाव आहे सातपुड्याच्या चौथ्या पुड्यातील अतिदुर्गम भागातील. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुव्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर. होळी उत्सवासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या या गावात गुरुवारी (दि.१७) अपूर्व उत्साह होता. ७७५ वर्षांची परंपरा असलेली राजवडी होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील पर्यटक अन् आदिवासी बांधवांचे जथ्येच्या जथ्ये दुपारपासूनच दाखल होऊ लागले होते. कोरोनाने दोन वर्षे कहर केल्याने येथील प्रसिद्ध राजवडी होळी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी झाली होती. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आदिवासींमध्ये अपूर्व उत्साह होता. सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पाड्यावरील अन् कुटुंबातील किमान एक सदस्य या उत्सवात सहभागी झाल्याने काठी गावात रात्री १० वाजता पाय ठेवायलाही जागा नव्हती. हे या वर्षीच्या होळीचे वैशिष्ट्य. येथील होळीसाठी दरवर्षी सर्वात उंच बांबू जंगलातून आणला जातो. सध्या सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने तो उपलब्ध नसल्याने यंदा ९ भाविक पाच दिवसांपूर्वीच गुजरात राज्यातील राजपिपलाच्या जंगलात पोहोचले. तेथे ६० फूट उंच बांबूचा शोध घेतला, कोणत्याही साहित्याचा वापर न करता तो केवळ हाताने जमिनीतून खोदून व काठी गावापर्यंत खांद्यावर या ९ भाविकांनी पायी आणला. रस्त्यात ठिकठिकाणी या बांबूची पूजा करण्यात आली व नवस फेडण्यात आला.

संकट दूर करावे अशी प्रार्थना: अनादी काळात आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजापांठा व गांडा ठाकूर यांनी एकत्र येत या उत्सवाला प्रारंभ केल्याचे सांगितले जाते. सुमारे १२४६ या सालापासून काठी संस्थानचे पहिले राजे उमेदसिंह सरकार यांनी या होलिकोत्सवाला राजवळी होलिकोत्सव म्हणून प्रारंभ केला ती परंपरा आजही जोपासली आहे. होळी मातेने मानव जातीवर येणारे प्रत्येक संकट दूर करावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

बांधवांचा प्रचंड जल्लोष
रात्री १० वाजेच्या सुमारास हा बांबू काठी गावात पोहोचला, यावेळी आदिवासी बांधवांनी प्रचंड जल्लोष केला. होळीसाठी आधीच गावाच्या चौकात मोठा खड्डा खोदून त्यात बांबू गाडण्यात आला होता.

साडेसातशे वर्षांची परंपरा
होळीसाठी लागणारा सुमारे ६० फूट पेक्षाही अधिक लांबीचा दांडा (बांबू) गुजरातमध्ये पायपीट करुन आणला. दांडा आणण्याचा हा प्रवास अविरतपणे सुरू आहे. याला साडेसातशे वर्षांची परंपरा आहे.

बातम्या आणखी आहेत...