आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या कवेतच सोडले प्राण:घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद; आजारी पत्नीला खांद्यावरून 4 किमी पायी नेले, धडगावच्या चांदसैली घाटातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोंगरांवरील ब्लास्टिंगमुळे दरड कोसळल्याचा अंदाज

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चांदसैली घाटात दरड कोसळली होती. यामुळे सुमदीबाई या महिलेला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाला रस्ताच राहिला नाही. त्यामुळे पती आदल्या पाडवीने आजारी सुमदीबाईला खांद्यावर घेऊन ४ किमी पायपीट केली. मात्र, तिने रस्त्यातच शेवटचा श्वास घेतला... ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. खान्देशात सलग दुसऱ्या दिवशी वेळीच उपचार न झाल्याने आजारी रुग्णाला प्राण गमवावे लागले आहेत.

चांदसैलीच्या सुमदीबाईंना रात्रीपासून उलट्या होत होत्या. पहाटे ४ च्या सुमारास नंदुरबार येथे उपचारासाठी चारचाकीने त्यांचे पती घेऊन जात होते. मात्र चांदसैली घाटातील पहिल्या वळणावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. येथे पहाटे ४ वाजेपासून माजी जि. प. सदस्य योगेश पाटील हेही अडकलेले होते. त्यांनी पहाटे ५ वाजता तळोदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी ७ च्या सुमारास अधिकाऱ्यांशी संपर्क झाला.

तत्पूर्वी, सुमदीबाईंची प्रकृती अधिकच खालावल्याने ६.३० वाजता पाडवींनी तिला खांद्यावर घेऊन नंदुरबारच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. ४ किमी अंतर कापल्यावर मदतीला एका स्थानिकाची दुचाकी अाली. त्यावर पाडवी पत्नीस घेऊन निघाले. थोड्या वेळातच पत्नीचा मृत्यू झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी माघारी फिरून परतीचा प्रवास सुरू केला.

आदिवासींपर्यंत आरोग्य यंत्रणा कधी पोहोचणार?
या घटनेमुळे सातपुड्यातील आदिवासींचे दुःख पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे या भागाचे प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी करतात. हा चांदसैली घाट दरवर्षी दरड कोसळल्यामुळे बंद पडतो व हजारो आदिवासी बांधवांचे जगणे वेठीस धरले जाते. त्याचा नाहक फटका सुमदीबाईंना बसला. चांदसैली गावात आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे लोकांना नंदुरबार, तळोदा, धडगाव येथे धाव घ्यावी लागते.

डोंगरांवरील ब्लास्टिंगमुळे दरड कोसळल्याचा अंदाज
धडगाव येथे १३२ केव्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. तळोदा ते धडगाव वीजवाहिनीसाठी घाटात टाॅवर उभारले जात आहे. यासाठी घाटातील डोंगरांवर ब्लास्टिंग सुरू आहे. यामुळे परिसरात धक्के बसून घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ब्लास्टिंगआधी रस्त्याकडच्या डोंगरकपारींना लोखंडी जाळी बांधणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदार अशी कोणतीही खबरदारी घेत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

बातम्या आणखी आहेत...