आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठीच्या होळीचे शुभसंकेत:यंदाच्या वर्षी पाऊस उत्तम; रोगराईही दूर होणार, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह गुजरातमधून आदिवासी बांधवांनी लावली हजेरी

काठी (जि. नंदुरबार) | विकास पाटील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजवाडी होळीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या काठीच्या होळीने यंदा देशासह राज्यातील पाऊसमान उत्तम राहील, पिकांचे उत्पादनही जोरदार येईल, नैसर्गिक आपत्ती टळेल व रोगराईही दूर होईल, असे शुभसंकेत दिले आहेत. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी काठी (ता.अक्कलकुवा) या गावात होळी साजरी करण्यात येते. होळीतील उंच दांडा पूर्व दिशेला पडल्याने तो शुभ मानला जातो. यंदा तो पूर्वेलाच पडल्याने आदिवासी बांधवांनी प्रचंड जल्लोष केला.

कोरोनाने कहर केल्याने गेल्यावर्षी होळीच्या आनंदावर विरजण पडले होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा काठीच्या होळीला विशेष महत्त्व होते. त्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील वाड्या-पाड्यांवरील आदिवासी बांधव दरवर्षीच येथे येतात. यंदा मात्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आकर्षक वेशभूषा अन् पारंपरिक वाद्याच्या साथीने बेधुंद सामूहिक नृत्य करीत देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांची मने जिंकली. त्यांच्यासोबत नृत्य करीत त्यांनीही रात्रीपासून तर सूर्योदय होईपर्यंत मनमुराद आनंद लुटला.

गेल्या वर्षी दांडा तुटला
गेल्यावर्षी होळी साजरी झाली मात्र अत्यंत साध्या पद्धतीने. होळीचा उंच दांडा उभा करतानाच तो तुटला. ही घटना अशुभ मानली गेली. आपल्यावर संकट येईल, असे आदिवासींचे म्हणणे होते. त्यानुसार कोरोनाचे संकट आले. पाऊसमान अनियमित, अतिवृष्टीचा सामना करावा लागला. यंदा मात्र होळीने शुभसंकेत दिल्याने आदिवासी बांधव आनंदात आपल्या पाड्यांकडे रवाना झाले.

हे दृश्य आहे नंदुरबार जिल्ह्यातील देशभरात प्रसिद्ध असलेल्या राजवाडी काठी होळीचे. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सातपुड्यातील काठी गावात एकत्र आले. आकर्षक पेहराव करत पारंपरिक वाद्यांच्या साथीने त्यांनी नृत्य केले. त्यानंतर शुक्रवारी (दि.१८) पहाटे ५ वाजेच्या सुमारास होळी पेटवण्यात आली. या वेळी होळीभोवती पुन्हा एकदा फेर धरून बेधुंद नृत्य सादर करत होळीमातेचा जयघोष केला. वन्यजीव छायाचित्रकार सागर खेडकर यांनी पॅनोरमाने टिपलेला हा अविस्मरणीय क्षण खास “दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी.

तब्बल ७७५ वर्षांची परंपरा
हे वर्ष कसे राहील याचे संकेत येथील होळीच्या माध्यमातून मिळतात अन् ते अचूक असतात, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. त्याला एक-दोन नव्हे तर ७७५ वर्षांची अखंड परंपरा आहे. त्यामुळे यंदाचे (२०२२) हे वर्ष कसे राहील याबाबत प्रचंड उत्सुकता होती. शुक्रवारी पहाटे ५ वाजता होळी पेटवली. होळीचा ६० फूट उंच दांडा आगीने पूर्व दिशेला पडला अन् उपस्थित हजारो आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला. कारण पूर्व दिशेला हा दांडा पडल्याने यंदाचे वर्ष आनंदात जाईल, संकट टळेल असे संकेत होळीने दिले.

पहा काही निवडक छायाचित्र

बातम्या आणखी आहेत...