आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट:अवकाळी पाऊस ; 30 पथारींवर वाळणाऱ्या 25 हजार क्विंटल मिरचीला बसला फटका

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पथारीवर २५ हजार क्विंटल मिरची वा‌ळायला टाकली आहे. हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात १३ व १४ डिसेंबर या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र मंगळवारी दुपारी सूर्यप्रकाश पडल्यानंतर सर्व मिरची पथारीच्या मालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यानंतर लगेच सायंकाळी अवकाळी पावसाने तुरळ हजेरी लावली. मात्र दोन दिवसांपासून पावसाच्या भीतीने सर्व मिरचीवर गोणपाटचे आच्छादन केलेे असून अधिक पाऊस झाल्यास १५ कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिरचीची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या स्वादिष्ट मिरचीला राजस्थान, गुजरात तर कधी कधी विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नंदुरबार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतून ओली मिरची खरेदी करून ती वाळवण्यासाठी व्यापाऱ्यांना कसरत करावी लागते. बेमोसमी पावसामुळे वाळायला घातलेल्या मिरचीचे कधी मातेरे होईल, याची शाश्वती नसते.

यंदाच्या हंगामात मिरची व्यापाऱ्यांनी ८० रुपये किलो या दराने खरेदी केलेल्या मिरचीचे भाव कोसळल्याने ते आधीच तणावात असताना अचानक हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्यानंतर शहरातील ३० मिरची पथारी चालकांची झोपच उडाली.

साधारण एका मिरची पथारीवर ५० लाखांची मिरची वाळवण्यासाठी पसरवली असून १५ कोटी रुपयांची मिरची केवळ राम भरोसे आहे. अशातच पाऊस केव्हा पडेल याची शाश्वती नाही. यामुळे सर्वच व्यापारी गेल्या दोन दिवसांपासून तणावात दिसले. व्यापाऱ्यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी सर्वच मिरची एका ठिकाणी गोळा करून त्यावर आच्छांदन टाकले. सुदैवाने दुपारी तीन वाजता ढगाळ वातावरणात बदल हाेऊन सूर्यदर्शन झाल्याने सर्वांचे चेहरे फुलले.

अवकाळी पावसाची भीती
यंदा मिरचीचे सुरुवातीला भाव ८० रुपये किलो होते. ते आता ५० रुपये किलोंनी झाले. त्यामुळे आम्हाला आधीच नुकसानीचा फटका बसला आहे. अशातच हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे आम्हाल नुकसान होण्याची भीती आहे. तर सायंकाळी झालेल्या तुरळक पावसाचा फटका जाणवेल. उद्या अधिक पाऊस पडू नये, यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.-संदीप अग्रवाल, मिरची विक्रेता, नंदुरबार

तेजा, व्हीएनआर मिरचीची आवक
सध्या नंदुरबार शहरात तेजा, व्हीएनआर व ५५३१ या प्रकाराची मिरची विक्रीसाठी येत आहे. या मिरचीला राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील अहमदनगरला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मिरची वाळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी ती पथारीवर टाकली आहे; परंतु व्यापाऱ्यांना नुकसानीची भीती वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...