आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:नंदुरबार जिल्ह्यात 132 ग्रा.पं.साठी आज मतदान; बहुतांश ठिकाणी चुरस

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात चार तालुक्यांत मिळून १३२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान हाेणार आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा समावेश आहे. ग्रा.पं. सदस्यांच्या ५६ जागांसाठी १५१ तर सरपंचांच्या १७ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी २९ हजार ७१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यात १४ हजार ५५७ पुरुष मतदारांचा तर १४ हजार ५१४ महिला मतदारांचा समावेश आहे. रविवारी १७ ग्रामपंचायतींसाठी हाेणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी शनिवारी संध्याकाळपर्यंत मतदान यंत्र व अन्य साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

साहित्य, कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था
तालुक्यातील तिसी, अमळथे, ढंढाणे, धानोरा, घुली, करणखेडा, खैराळे, कोठडे, आेसर्ली, सातूर्खे, तलवाडे, राकसवाडे, रनाळे, रजाळे, आसाणे, घोटाणे, चौपाळे या १७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळपासून मतदान यंत्र व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांना साहित्यासह मतदान केंद्रापर्यंत पाेहाेचवण्यासाठी प्रशासनाने एस.टी. बसेससह खाजगी चारचाकी वाहनांची व्यवस्था केली हाेती. मतदान प्रक्रियेनंतर याच वाहनांनी कर्मचारी व साहित्य येथे आणण्यात येईल.

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश अमृतकर, नितीन पाटील, रमेश वळवी आदींनी मतदान केंद्रासाठी नियोजन केले असून तहसील कार्यालयाच्या आवारात सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह साहित्याचे वाटप करण्यात आले. ते साहित्य घेऊन दुपारपासून संध्याकाळपर्यंत सर्व कर्मचारी वाहनांद्वारे ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी रवाना झाले आहेत.

पाच संवेदनशील केंद्र; विशेष बंदाेबस्त
१७ मतदान केंद्रात प्रत्येकी चार अधिकारी, एक पोलिस, एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त आहेत. १७ ग्रा.पं.साठी एकूण ५९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी आसाणे, तलवाडे, रनाळे, धानोरा, चौपाळे ही मतदान केंद्रे संवेदनशील असून विशेष बंदाेबस्त तैनात आहे.

सर्वात कमी ६९ मतदार घुलीत, तर सर्वाधिक १५४८ रनाळे केंद्रात
निवडणूक हाेत असलेल्या ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींच्या ३० सदस्यांच्या मतदान केंद्रात ८०० पेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. अन्य दोन मतदार केंद्रात देखील ८०० पेक्षा अधिक मतदार आहेत. सर्वात कमी ६९ मतदार घूली मतदान केंद्रात आहेत. तर सर्वाधिक १ हजार ५४८ मतदार रनाळे केंद्रात आहेत.

बातम्या आणखी आहेत...