आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी:मोलगी येथील महिलेचा मृत्यू सर्पदंशाने नव्हे तर आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे; आमदार आमशा पाडवी यांचा आरोप

अक्कलकुवा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठी येथील नीलिमा वळवी (वय २२) या महिलेचा सर्पदंशामळे मृत्यू झाला होता. मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. त्यामुळे आमदार आमशा पाडवी यांनी काठी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. या महिलेचा मृत्यू केवळ सर्पदंशाने झालेला नव्हे तर आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळेच झाला आहे, असा आरोप करून वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांकडे केली आहे.

आमदार पाडवी यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांना आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी शासनस्तरावरून रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांची संसाधने व यंत्रणा पुरवली आहेत. मात्र ढिसाळ नियोजन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ते निरुपयोगी ठरत आहेत. तर रुग्णालयांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मोलगी ग्रामीण रुग्णालयात सुविधांची वानवा आहे. प्रसूती कक्षातील दुर्गंधी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचेच प्रतीक आहे. शौचालयांची अत्यंत दुरवस्था आहे. या दुर्गंधीयुक्त वातावरणात रुग्ण मरू शकतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत रुग्णालयांकडे लक्ष देऊन त्यांचे काटेकोरपणे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक यांची नाही का असा सवाल आमदार पाडवी यांनी केला. दोषींवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचेही आमदार आमशा पाडवी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

तीन रुग्णवाहिकांसाठी एकच चालक; रुग्णांची होतेय गैरसोय
मोलगी ग्रामीण रुग्णालयात ३ रुग्णवाहिका आहेत मात्र तिन्ही रुग्णवाहिकांसाठी एकच चालक उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिकेत तर अद्यापपर्यंत इतर साहित्य बसवले नाही. तसेच तिच्यावर चालक नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका केवळ शोभेची वस्तू म्हणून उभी असल्याचे आमदार पाडवींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...