आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रगतिशील महाराष्ट्राचे चित्र:राज्यातील 1 कोटी विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित; मंत्री म्हणतात, तक्रार नाही!

प्रदीप राजपूत | जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा बंद असल्याने ताजा आहार देणे शक्यच नाही - वर्षा गायकवाड

वाकोदचा जय तडवी शाळेतून घरी परतल्यावर शाळेत मिळालेला पोषण आहार लहान बहिणीसोबत खायचा. सध्या शाळा दूर, आहार दूर, दोन्ही भावंडे आईवडिलांसोबत शेतात मजुरीला जातात. गेल्या पाच महिन्यांत त्यांना फक्त डाळ आणि तांदूळच मिळाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकणारा अय्युब तडवी आणि तुषार तडवी यांचीही तीच कहाणी. चौथ्या इयत्तेत गेलेल्या या दोघांची अंगकुळी पहिलीच्या विद्यार्थ्यासारखीच. शाळेत मिळणारी खिचडी हाच त्यांचा आधार. गेल्या पाच महिन्यांत या दोघांचं वजन कमी झालंय. सध्या ते वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी जातात. हे चित्र आहे “पोषण महा’ अभियान साजरे करणाऱ्या प्रगतिशील महाराष्ट्राचे.

जागतिक आरोग्य संघटना आणि सीरम इन्स्टिट्यूट यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भविष्यात ५ ते १७ या वयाेगटातील मुलांमध्ये काेराेना संसर्गाची सर्वाधिक भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या जागतिक आराेग्य आपत्तीत या वयाेगटातील मुलांना सशक्त ठेवणे, त्यांची राेगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे यासाठी पाैष्टिक आहारावर गांभीर्याने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र शाळांच्या ऑनलाइन - ऑफलाइनच्या चर्चेत मध्यान्ह भोजनाच्या पर्यायाचा विषय अंधारात ठेवण्यात आला. सर्वाेच्च न्यायालयाने कानटाेचणी केल्यानंतर जाग आलेल्या शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या घरी दाेन डाळी पाठवून १ कोटी मुलांना एकाच दिवसात सशक्त केल्याचा देखावा निर्माण केला आहे. साेमवार ते शनिवारपर्यंत अनुक्रमे तुरडाळीचे फाेडणीचे वरण, मुगाची उसळ आणि भात, मसूरडाळीचे वरणभात, मटकीची उसळ, भात, चवळी उसळ, भात, मूग डाळीची खिचडी असे पोषक पदार्थांची बोळवण सध्या फक्त डाळ-तांदळावर करण्यात आली आहे.

परिस्थितीनुसार निर्णय...

काेराेनामुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शाळेत बाेलावून गरम आहार देणे शक्य नाही. मुलांच्या आहाराचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने त्यांना शाळेतून पॅकेट स्वरूपात डाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच कडधान्येसुद्धा पॅकिंग देण्यात येतील. परिस्थिती सुधारेल त्यानुसार या याेजनेत बदल करू. तक्रारी असल्यास कारवाई करू दत्तात्रय जगताप, शिक्षणसंचालक, पुणे.

शाळा बंद असल्याने ताजा आहार देणे शक्यच नाही

शाळा बंद असल्याने ताजा आहार शिजवून विद्यार्थ्यांना देणे शक्यच नाही. त्यामुळेच डाळ-तांदूळ त्यांच्या घरी पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही कुणाला मिळाले नसल्यास तशी तक्रार आलेली नाही. आली तर कारवाई करू. - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

बातम्या आणखी आहेत...