आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूमीहीन लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी सद्यस्थितीत पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. एवढ्या कमी पैशांमध्ये जागा मिळणे शक्य नसल्याचे सर्व आमदारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणी केली. ही अर्थसहाय्याची रक्कम 1 लाख रुपये करण्यात येणार असून पंधरा दिवसांमध्ये त्याबाबत शासन निर्णय घेणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
अमृत महाआवास अभियानांतर्गत जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मंत्री पाटील बोलत होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पंकज आशिया आदी उपस्थित होेते. प्रकल्प संचालक मिनल कुटे यांनी अभियानांतर्गत सादरीकरण केले. यावेळी अमृत यशोगाथाचे प्रकाशन करण्यात आले. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकूल योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणारे गटविकास अधिकारी,ग्रामपंचायत,सरपंच यांना पुरस्कार देवून मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना घरकुलांची चावी देण्यात आली.
मंत्री पाटील यांनी घरकूले अपूर्ण राहण्यामागे वाळू हे एक कारण आहे. गिरणाचीच पाहिजे, तापीची नको अशी भूमिका आहे. फ्लॅट सिस्टीम्समध्ये जाण्यास लाभार्थी तयार नाहीत. गायरान जमीनीवर घरकुलांबाबत शासनस्तरावर सुधारणा व्हावी, असे सांगितले.
ग्रामविकास विभागाची पंगत आमच्याकडे तर फायदा व्हावा, अशी अपेक्षा महाजन यांच्याकडून व्यक्त करत मंत्री पाटील यांनी त्यांना ग्रामविकास विभागाबाबतच्या तीन सूचना केल्या. आवास योजनेतील अडचणी सोडवून लवकर उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात यावा, घरकूल लाभार्थ्यांना पहिला धनादेश देताना त्यांनी वस्तू खरेदी केलेल्या दुकानदार व इतरांना रक्कम देण्याबाबत तरतूद करावी. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्ह्यात रिक्त असलेली पदे भरावीत.
31 मार्चपर्यंत घरकूले पूर्ण करायची आहेत. घाईत गुणवत्ता टीकणार नाही, याची काळजी घ्या, घरकुलांसाठी जागेचा विषय येता कामा नये, अशा सूचना ग्रामविकासमंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात मंत्र्यांची गावे असूनही दुर्देवाने हगणदारी मुक्ती झाली नसल्याचे सांगावे लागते. गावांची वाईट अवस्था दिसते. त्याशिवाय स्वच्छ भारत अभियान यशस्वी कसे होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.