आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागृहकर्जाचा हप्ता मिळाला नाही अशी थाप मारून भामट्यांनी एकाची १० लाख रुपयांत ऑनलाइन फसवणूक केली होती. संबंधित व्यक्तीने तत्काळ सायबर पोलिसांना माहिती दिल्यामुळे तांत्रिक तपास करून अवघ्या दोन तासांत दोन बँकांच्या खात्यातून रक्कम गोठवली. त्यानंतर दोन दिवसांत संबंधित व्यक्तीला हे पूर्ण पैसे परत करण्यात यश आले आहे. सतीश काळमेघ (वय ५०) यांना १७ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. ‘एचडीएफसी बँकेच्या हाउसिंग लोन डिपार्टमेंटमधून बोलत असून, तुमचा लोनचा हप्ता कपात झाला नाही. आजच्या आज ऑनलाइन हप्ता नाही भरला तर जास्त दंड लागेल’ असे धमकावून काळमेघ यांना ऑनलाइन हप्ता भरण्यास भाग पाडले. त्यासाठी भामट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून अर्ज भरण्यास सांगितले. हा फॉर्म भरताच काळमेघ यांच्या बँक खात्यातून १० लाख रुपये परस्पर वर्ग झाले होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळमेघ यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, सचिन सोनवणे व श्रीकांत सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच तांत्रिक तपासाला सुरुवात केली. काळमेघ यांच्या बँक खात्यातून एसबीआय, पश्चिम बंगालमधील एका खात्यात रक्कम वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन तासात सुरुवातीला नऊ व नंतर एक असे एकूण १० लाख रुपये वर्ग झालेले दोन्ही बँक खाती पोलिसांनी गोठवून घेतले. त्यानंतर काळमेघ यांच्या बँकेशी संपर्क साधून ही रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा केली. दोन दिवसांनी काळमेघ यांना ही रक्कम परत मिळाली.
अनोळखी लोकांना माहिती देऊ नका : अनोळखी मोबाइल क्रमांकावरून येणाऱ्या लोकांना बँक खात्याची माहिती देऊ नये. अनोळखी व्यक्तींसाेबत ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे. ऑनलाइन व्यवहारांचे पासवर्ड स्ट्राँग ठेवावे. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करावा, अशी माहिती पोलिस निरीक्षक कानडे यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.