आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 15 अभ्यासमंडळांच्या बैठका सोमवारी झाल्या. यात तीन अभ्यासमंडळांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत डॉ. गुणवंत सोनवणे, डॉ. मनोजकुमार चोपडा आणि डॉ. मधुकर पाटील हे अनुक्रमे रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयाच्या अध्यक्षपदी निवडून आले. तर उर्वरित 12 अभ्यासमंडळांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.
एकूण 25 अभ्यासमंडळांच्या निवडणूकांचा कार्यक्रम विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केला होता. 10 एप्रिल रोजी 15 अभ्यासमंडळांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी अभ्यासमंडळांच्या सदस्यांना संबोधित केले. नवीन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अभ्यासमंडळांची जबाबदारी अधिक वाढली असून देशपातळीवर आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे राहणार नाही याची काळजी अभ्यासमंडळांनी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली उदासिनता दूर करावी लागेल असे प्रा. माहेश्वरी म्हणाले.
तर प्र-कुलगुरू प्रा. इंगळे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करावेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी ज्या अभ्यासमंडळाची निवडणूक होणार होती त्याची माहिती दिली. निवडून आलेल्या अध्यक्षांना कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
निवडणूकीत निवडून आलेले सदस्य असे
रसायनशास्त्र : प्रा. दीपक दलाल (रसायनशास्त्र प्रशाळा, विद्यापीठ) आणि डॉ. गुणवंत सोनवणे (किसान महाविद्यालय, पारोळा) हे दोन उमेदवार उभे होते. डॉ. सोनवणे यांना सहा तर प्रा. दलाल यांना चार मते. डॉ. सोनवणे विजयी.
प्राणीशास्त्र : डॉ. मनोजकुमार चोपडा (मु.जे. महाविद्यालय, जळगाव) व डॉ. प्रवीण महाजन (ऐनपूर महाविद्यालय, ऐनपूर) या दोन्ही उमेदवारांना समसमान चार मते पडली. चिट्टी द्वारे डॉ. चोपडा विजयी.
वनस्पतीशास्त्र : डॉ. किशोर बोरसे (एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळे) व डॉ. मधुकर पाटील (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार) हे दोन उमेदवार उभे होते. डॉ. पाटील यांना सहा तर डॉ. बोरसे यांना दोन मते. डॉ. पाटील विजयी. आचारसंहिता भंगाबाबत डॉ. बोरसे यांनी केलेली तक्रार विद्यापीठाने अमान्य केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.