आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविष्ठेचा वास येतो या कारणावरून चोपडा तहसील व शहर पोलिस स्थानकाच्या आवारात असलेले एक चिंचेचे मोठ झाड रविवारी तोडले. या झाडावर घरट्यात असलेले १२० पानकावळे, गायबगळे, छोटा बगळा, ढोकरी (वंचक) यांचा मृत्यू झाला. ५५ अंडी फुटली. तर पक्षिमित्रांनी धाव घेऊन सुमारे २१० पक्ष्यांना जीवदान दिले.
पंधरा दिवसांपूर्वी या झाडाची एक फांदी कुणीतरी तोडली. त्या दिवशी १०० पेक्षा जास्त पक्षी निराधार झाले होते. पक्षिमित्र कुशल अग्रवाल यांनी तहसील कार्यालयात येऊन झाड, फांदी तोडू नका अशी विनंती केली होती. दरम्यान, रविवारी सुटीचा दिवस निवडून हे झाड तोडण्यात आले. त्यामुळे पक्ष्यांची हानी झाली. या चिंचेच्या जुन्या वृक्षावर गायबगळे, पानकावळे यांचा अनेक वर्षांपासून अधिवास होता. परिसरात पक्ष्यांची विष्ठा पडते, घाण वास येतो या कारणाने वृक्षतोड होत असल्याची माहिती काही पर्यावरणस्नेही नागरिकांनी वन्यजीव संरक्षण संस्थेला दिली. संस्थेचे कुशल अग्रवाल, पक्षी अभ्यासक हेमराज पाटील हे घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत चिंचेचे झाड तोडण्यात आले होते. वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे, वनकर्मचारी नोकेश बारेला, विपुल पाटील यांच्या पथकाने पंचनामा केला. पक्षिमित्र, वनकर्मचाऱ्यांनी जखमी पक्षी ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवले. वृक्षतोड करण्याचे आदेश देणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुढील कार्यवाहीबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता
दरम्यान, चाेपडा येथील तहसीलदार अनिल गावित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ताे हाेऊ शकला नाही. या घटनेप्रकरणी प्रशासनाची बाजू कळू शकली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाहीकडे आता जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी वृक्षतोडीबाबत काय निर्णय घेतात? याची उत्सुकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.