आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारभूत किंमत खरेदी:जळगाव जिल्ह्यातील 12 हजारांवर शेतकऱ्यांनी हमी भावाने केली 99 कोटींच्या हरभऱ्याची विक्री

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 12 हजारावर शेतकऱ्यांनी 99 कोटी रुपयांचा पावणेदोन लाख क्विंटल हरभरा हमीभावाने विक्री केला आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभावाने हरभरा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा 26 कोटींचा मोबदला शासनाकडे थकीत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून पेरणीसाठी शासनाने हा मोबदला त्वरित उपलब्ध करुन देण्याबाबत शेतकरी मागणी करीत आहेत.

हरभरा खरेदीसाठी शासनाने जिल्ह्यात पंधरा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक व म्हसावद येथे एक असे एकूण 16 खरेदी केंद्रावर 5 हजार 240 रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने हरभरा खरेदी करण्यात आला. 29 मे पर्यंत जिल्ह्यातील खरेदी केंद्र सुरू होते. ही मुदत संपल्यानंतर शासनाने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र बंद केले. हमीभावाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आलेला असल्याचे जिल्हा विपणन अधिकाऱ्यांनी सांगितले.

72 कोटींचा शेतकऱ्यांना मिळाला मोबदला

जिल्ह्यातील सोळा खरेदी केंद्रांवर 12 हजार 564 शेतकऱ्यांनी 1 लाख 94 हजार 212 क्विंटल हरभराची हमीभावाने विक्री केली. हमीभावाने हरभरा विक्रीचा एकूण 99 कोटी रुपयांचा मोबदला शासनाकडे होता. त्यापैकी आतापर्यंत शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 72 कोटी रुपयांचा मोबदला दिलेला आहे. अद्याप 26 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. हमीभाव विक्रीचा शासनाकडून मोबदला देताना काही शेतकऱ्यांनी संयुक्त किंवा जनधन योजनेंअतर्गत उघडण्यात आलेले बँक खाते क्रमांक दिलेले होते. त्या बँक खात्यांमध्ये मोबदला वितरित करण्यास अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा विपणन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना स्वत:चा बँक खाते क्रमांक देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...