आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बीएचआरच्या फक्त 77 कर्जदारांकडील 132 कोटींची ओटीएस मंजूर

सुधाकर जाधव | जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाईचंद हिराचंद रायसोनी या अवसायनात असलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थेने कर्जवसुलीसाठी एकमुस्त परतफेड योजना (ओटीएस) लागू करण्यात आली. या योजनेत केवळ ७७ कर्जदारांनी सहभाग घेतला. त्यांचे प्रिन्सिपल कर्जाची रक्कम १०१ कोटींवर असून, त्यांना १३२ कोटी ५२ लाख ७२ हजार रुपयांची ओटीएस मंजूर झाली आहे. या योजनेकडे मोठ्या कर्जदारांनी पाठ फिरवली आहे. अद्यापही ठेवीदारांच्या ७०० कोटींच्या ठेवी या पतसंस्थेत अडकलेल्या आहेत. योजनेत सहभागी न झालेल्या कर्जदारांना विलफूल डिफॉल्टर घोषित करून त्यांच्याविरुद्ध वसुलीची कठोर कारवाई करण्याचा इशारा अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिला आहे.

बीएचआरने एकमुस्त परतफेड योजना २०२२ लागू केली होती. सर्व कर्जदारांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन अवसायकांनी ८ जून रोजी केले होते. या तारखेपासून ३० दिवसांच्या आत त्यांच्या कर्जाच्या पाच टक्के रकमेसह संस्थेच्या मुख्य कार्यालयात अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. जे कर्जदार या योजनेत सहभागी होणार नाहीत. सोसायटीच्या थकीत कर्जाची संपू्र्ण परतफेड करणार नाहीत. त्यांना विलफूल डिफॉल्टर घोषित करून वसुलीची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. योजनेच्या मुदतीत ७७ कर्जदारांनी कर्जाच्या ओटीएससाठी अर्ज केले आहेत. त्यांनी अर्जासोबत पाच टक्के प्रमाणे बीएचआरकडे १२ कोटी ५६ लाख ५७२ रुपये जमा केले आहेत.

...तर नऊ टक्के व्याज वसुली केली जाईल
ओटीएस लागू करण्यात आलेल्या कर्जदारांना पहिल्या तीन महिन्यांत २५ टक्के ओटीएस रक्कम भरायची आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम त्यानंतरच्या तीन महिन्यांत भरायची आहे. या कालावधीत परतफेड न केल्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल. मात्र, त्यासाठी ओटीएस लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ टक्के व्याजासह परतफेड करावी लागणार आहे.

१० कोटींचे कर्ज झाले तब्बल ५० काेटी
पतसंस्था अवसायनात आल्यानंतर कर्जदारांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. शहरातील १० कोटी रुपये कर्ज घेतलेला कर्जदार बीएचआरमध्ये ओटीएससाठी गेला होता. त्यांच्या कर्जाची व्याजासह रक्कम ५० कोटींवर आहे. त्यांना मासिक ३७ लाख रुपये हप्ता ठरवून दिला हाेता.

त्यांनी चार महिनेच हप्त्यांची परतफेड केली. २०१५ नंतर कर्जाच्या मूळ रकमेवर आलेले व्याजही भरले नाही. उर्वरित ८.५० कोटी रुपये भरण्याची त्या कर्जदाराने तयारी दर्शवली आहे; परंतु ओटीएसनुसार किमान १७ काेटींची रक्कम त्या कर्जदाराला भरावी लागणार आहे. त्यामुळे अवसायकांनी ओटीएसचा लाभ देण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...