आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराममुराबाद पुलाजवळील नवीन आसोदारोडवरील पवननगरातील रिक्षाचालक, हमाल, हातमजूर या असंघटित कामगार व परिसरातील महिलावर्गाने श्रमदान व दानशूरांच्या देणगीतून सुमारे ५०० स्क्वेअर फूट जागेत पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. अनावश्यक खर्च टाळत शक्य ती कामे श्रमदानातून करण्याकडे या भाविक वर्गाचा प्रयत्न सुरू आहे. येत्या दाेन महिन्यांत मंदिराचे काम पूर्ण हाेणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. पवननगरात २० वर्षांपूर्वी विठ्ठल पारवाल, सुधाकर गोंधळी यांनी या ठिकाणी हनुमानाचे मंदिर उभारले होते. मंदिराच्या बाजूला लावेलली उंबर आणि पिंपळाची वृक्ष आता डेरेदार झाली आहेत.
शहराच्या या वाढत्या भागात विविध धार्मिक उपक्रमांसाठी मंदिर नसल्याने पिंपळाच्या वृक्षाच्या नावाने पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारण्याचा संकल्प परिसरातील कष्टकरी नागरिकांनी केला. नियोजनासाठी समिती स्थापन करीत स्वत:चे जवळचे पैसे टाकून कामास सुरुवातही केली. मंदिरासाठी बाळू पाटील यांनीही ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून दिली. हनुमान मंदिरालाच लागून या जागेत मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. पायाभरणीचे काम पूर्णत्वास आले आहे. मंदिरासाठी दानशूरांकडून देणगी मिळत असली तरी भाविकही श्रमदानातून कामे करून घेत आहे. त्यामुळे पैशांची बचत होत असल्याचेही भाविकांनी सांगितले. मंदिर उभारणीसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश चौधरी, उपाध्यक्ष अजय गोंधळी, खजिनदार शेखर सोनवणे, विठ्ठल इंगळे, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील, विलास सोनवणे, वसंत गवळी आदी पाठपुरावा करीत आहेत.
हनुमान जयंतीसह विविध उत्सव हाेतात जल्लाेषात
मंदिरासाठी १५ फुटांचा कळस तयार केला जाणार आहे. यात महादेवासह नंदीच्या मूर्ती या ओंकारेश्वर येथून आणल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते आबा बाविस्कर यांनी यासाठी आर्थिक पुढाकार दर्शवला आहे. पवननगरातील नागरिकांतर्फे हनुमान जयंती, श्रीराम जयंती, गणेशोत्सवासह विविध उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक धार्मिक कार्यास परिसरातील भाविकांकडून उत्स्फूर्ते प्रतिसाद व सहभाग मिळत असल्याने मंदिरासाठीही भाविकांचे प्रयत्न सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.