आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुनिसेफ, सॅक्रेड आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बाला (बिल्डिंग अॅज लर्निंग एड ) या संकल्पनेवर आधारित जिल्ह्यातील 168 अंगणवाड्या स्मार्ट बनवण्यात येणार आहेत. या बालस्नेही उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून 16 कोटी 80 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. लवकरच अंगणवाड्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत 11 बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आलेला आहे. अंगणवाडी केंद्राला थ्रीडी पेंटिंग केले जाणार असून हॉल, किचन ऑणि टॉयलेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतच्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी हँडवॉश सेंटर उभारले जाईल. त्या ठिकाणी सोपकेस, साबण, आरसा, कंगवा हे साहित्य असेल.
अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी फळे, फुले, कार्टून, प्राणी, शैक्षणिक तक्ते तसेच आतून आणि बाहेरून थ्रीडी पेंटिंग केली जाईल. हॉलमध्ये चारही बाजूंनी काळा रंग देवून भिंतीलाच फळ्याचे रूप दिले जाईल. हॉल, किचन आणि टॉयलेटमध्ये लाइट फिटिंग करून स्वतंत्र प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे.
फॅन, टीव्ही, वजनकाटा चार्जिंग पॉइंट काढण्याच्या सुचना आहेत. अंगणवाडी केंद्राबाहेर ग्राऊंडवर सी-सॉ, घोडा-हत्ती, घसरगुंडी हे साहित्य ठेवले जाईल. पेव्हर ब्लॉक लावण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्रातील साहित्य ठेवण्यासाठी कडप्यांचे मोठ्या आकाराचे लोखंडी कपाट पुरवण्यात येणार आहेत. खिडक्यांना लोखंडी ग्रील तसेच अन्य सेवा आणि सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.
500 लीटर स्वतंत्र पाण्याची टाकी बसवणार...
पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर लावण्यात येणार आहे. बालकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी स्वच्छतेचे साहित्य पुरवले जाणार आहे. अंगणवाडी केंद्राबाहेर कुंड्यांमध्ये फुलांची झाडे, छोटी रोपटे लावण्याच्या सूचना आहेत. अंगणवाडी केंद्रावर 500 लिटरची स्वतंत्र पाण्याची टाकी बसवण्याची बाब अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आली आहे. अंणवाड्यांच्या बांधकामांसाठी प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश दिलेले असल्याने त्यांना पदवीधर मतदार संघ निवडणुकीची आचार संहितेची अडचण नाही.
चित्रांमधून मुलांना होईल बोध...
बालकांना शब्दांपेक्षा चित्रांची भाषा अधिक चांगली कळते. या अनुषंगाने बिल्डिंग अॅज लर्निंग एड म्हणजेच ‘बाला’ ही संकल्पना विकसित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत अंगणवाडी परिसरात चित्रांच्या माध्यमातून विविध बाबी आकर्षक पद्धतीने रेखाटण्यात येतात. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अभियंते, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवसीय कार्यशाळा जिल्हा नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे.
- देवेंद्र राऊत, महिला व बाल विकास अधिकारी जि.प.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.