आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​खान्देश रन:तीन किमी गटात 1,750 स्पर्धक सहभागी, मार्गावर फुलांचा वर्षाव

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुदृढ आणि निरोगी आरोग्याचा कानमंत्र देत सलग तिसऱ्या वर्षी जळगाव रनर्स ग्रुपने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये जळगावकरांनी रविवारची पहाट गाजवली. जळगावसह राज्यभरातून रनर्स सहभागी झाले होते. पहाटेच्या थंडीत विविध गटांतील तब्बल २ हजार ९०० नागरिकांनी धावण्याचा आनंद लुटला. २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५० नागरिकांनी सहभाग नोंदवला. सर्वाधिक १७५० नागरिक ३ किलोमीटरच्या रनमध्ये धावले. प्राेत्साहन देण्यासाठी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

संगीताच्या तालावर रनच्या सुरुवातीला व्यायाम, डान्स करण्यात आला. चार विविध गटात ही मॅरेथॉन झाली. पहाटे ५.३० वाजता थंडीत २१ किलोमीटर अंतराच्या या रनला सागर पार्क येथून अशोक जैन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर या गटांमध्ये स्पर्धा झाली. सागर पार्क येथून रनला सुरुवात झाल्यानंतर काव्यरत्नावली चौक, डी-मार्ट, लांडोरखोरी व यू-टर्न घेऊन पुन्हा सागर पार्कवर येऊन रनची सांगता करण्यात आली. खान्देश रनमध्ये उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्राैढ मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळेतील दिव्यांगही सहभागी झाले. खासदार उन्मेष पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, पोलिस सहअधीक्षक संदीप गावित, टाटा एआयजीचे मयूर शिंदे, डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, राजेश चोरडिया, मनोज आडवाणी, प्रा. डी. डी. बच्छाव, माजी महापौर रमेश जैन, प्रीतम रायसोनी, सम्राट शर्मा, तुषार भामरे, माजी महापाैर विष्णू भंगाळे लोकेश साळुंखे सहभागी झालेे.

जैन इरिगेशनचे सहकारी धावले खान्देश रनमध्ये जैन इरिगेशनचे हजारहून अधिक सहकारी धावले. सुरक्षा विभागातील महेंद्र राजपूत १० किमीमध्ये तृतीय तर वयस्कर वयोगटात भीमराव अवताडे द्वितीय आले. जैन परिवारातील अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मन जैन यांनी प्रत्यक्ष खान्देश रनमध्ये सहभाग घेतला. ट्रॉफी, सन्मानचिन्ह व पारिताेषिके देऊन विजेत्यांना गाैरवण्यात आले. रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मार्गावर उपचाराची केली हाेती व्यवस्था मॅरेथॉनमध्ये ५ वर्षाच्या मुलापासून ते ८५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत स्पर्धक सहभागी झाले. सागर पार्कसह मॅरेथॉन मार्गावर शहरातील डॉक्टर्सची टीम व रुग्णवाहिकाही उपलब्ध होत्या. मार्गावर ठिकठिकाणी उपचाराची सुविधाही या धावपटूंसाठी करण्यात आली.

मोटू-पतलूचे चिअरअप लक्षवेधी काव्यरत्नावली चौकात भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पुष्पवृष्टी झाली. पोलिस बॅण्ड पथकातील कलाकारांनी देशभक्तीपर गीते गायली. भगीरथ इंग्लिश स्कूलचे फेटाधारी झांज पथक, लुंकड कन्या शाळेचे लेझीम पथक होते. युवाशक्तीचे राहुल चव्हाण, प्रीतम शिंदे, विराज कावडिया, यश राठोड, दीपक धनजे उपस्थित होते. मोटू व पतलूचे चिअरअप लक्षवेधी ठरले.

बातम्या आणखी आहेत...