आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिंचोली (ता. यावल) येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातर्फे सलग १९ व्या वर्षी पालखीसह पायी दिंडी काढण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी दिंडी सावदा (ता. पारोळा) येथे दाखल झाली होती. योगायोगाने सावदा येथे काही दिवसांपासून नवागाव (ता. साक्री, धुळे) येथील बाल सेवेकरी मंडळाचा बाळू मामांचा रथ मुक्कामी आहे. देवमेंढ्यांचा कळप असलेल्या या मानाच्या रथाची सेवा सावाद्याचे नागरीक करीत आहेत. शुक्रवारी गावात यावलची दिंडी व बाळू मामाच्या रथाची अनोखी भेट झाली. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग भाविकांना अनुभवास मिळाला. राज्याच्या संत परंपरेतील महान संत म्हणून बाळू मामांना स्थान आहे. चिंचोली येथील रामचंद्र महाराज, विष्णू महाराज, महादेवनाथ महाराज यांच्यानंतर ऋषीकेश महाराज संस्था सांभाळत आहेत. तालुक्यातूनच वारकऱ्यांना सुविधा मिळावी म्हणून ऋषीकेश महाराज यांनी १९ वर्षांपासून या वारीला सुरूवात केली आहे. २५० वारकऱ्यांचा ताफा शुक्रवारी पारोळा तालुक्यातून भडगावकडे वळला. यात मृदुंगाचार्य विशाल महाराज, शिवदास महाराज, गायनाचार्य नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांचाही सहभाग आहे.
पायी चालत असताना अखंडपणे भजन, कीर्तन, विठ्ठलाचा नामजाप सुरू आहे. शुक्रवारी बाळू मामांचा रथाचीही सेवा करण्याची संधी वारकऱ्यांना मिळाली. सेवेकऱ्यांनी रथाचे दर्शन घेऊन माथ्यावर भंडारा लावला. त्यानंतर अनेकांनी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवमेंढ्यांच्या कानात इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर मेंढ्यांच्या कळपांना पाच प्रदक्षिणा घातल्या. एकाचवेळी समोर आलेल्या या दोन प्रसंगांमुळे भक्तीमय प्रचिती समोर आली. सकाळी १०.३० वाजता रथाच्या आरतीतही वारकऱ्यांनी सहभाग घेतला. शिंग असलेल्या देवमेंढ्यांना प्रचंड मान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.