आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतीउत्साह भोवला:हळदीच्या कार्यक्रमात पिस्तुल घेऊन डान्स; लॉकडाउन काळात नियमांची पायमल्ली करणाऱ्या नवरदेवासह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना आणि लॉकडाउन काळात लग्नावर किंवा इतर समारंभांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही काही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यातच जळगावमध्ये एका हळदीच्या कार्यक्रमात चक्क पिस्तुल घेऊन नाचतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी नवरदेवासह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नवरदेवानेच शेअर केला होता व्हिडिओ

शहरातील कानळदा रोडवरील धनाजी काळे नगरात गणेश महाजन या तरुणाचा विवाह होता. 19 मे रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास त्याने हळदीच्या कार्यक्रमात घरगुती साऊंड सिस्टीम लावला. यामध्ये 15 ते 20 तरुण नाचत होते. त्यात एका तरुणाला लोकांनी खांद्यावर घेतले होते आणि तो चक्क पिस्तुल घेऊन नाचत होता. याच नाच-गाण्याचा व्हिडिओ उत्साहाच्या भरात नवरदेवाने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर व्हायरल केला. नवरदेवाच्या मित्रांच्या या चुकीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

घरात जाउन चौकशी केली तेव्हा...

काही तासांमध्येच अनेक ठिकाणी पोहोचलेल्या या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली. जळगाव शहर पोलिस ठाण्याचे अक्रम शेख, भास्कर ठाकरे, रतनहरी गिते, प्रणेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी चौकशी केली असता हळदीच्या कार्यक्रमात पाहुण्यांची मोठी गर्दी पोलिसांना दिसून आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. अशातही अनेक जण छुप्या पद्धतीने आणि नियमांची पायमल्ली करून लग्नसोहळे आयोजित करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नवरदेवासह 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यासोबतच, व्हायरल व्हिडिओमध्ये पिस्तुलसोबत डान्स करणाऱ्या 5 जणांना ताब्यातही घेतले.

बातम्या आणखी आहेत...