आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनही वर्षाच्या निकालात १३% वाढ:विद्यापीठाने ‘हिशेब’ सुधारल्यामुळे वाणिज्यचे दोन हजार विद्यार्थी उत्तीर्ण

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर जाग आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तांत्रिक चुका दुरूस्त केल्या आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेले तब्बल १३ टक्के विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाची ही चूक दुरुस्त केली गेली नसती तर अकारण या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असते.

विद्यापीठाने वाणिज्य शाखेचे निकाल आधी घोषित केले होते. त्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीच्ी मागणी करीत आंदोलन चालवले होते. तीनही वर्षांच्या निकालात मोठी गडबड असल्याचा आरोप विद्यार्थी करीत होते. त्यानंतर या निकालाची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. आॅनलाईन झालेल्या या परीक्षेच्या उत्तरांच्या तपासणीत तांत्रिक अडचणी असल्याची बाब समोर आली. त्यानंतर त्या अडचणी दूर करण्यात आल्या तेव्हा तीनही वर्षांचे मिळून सरासरी किमान १३ टक्के विद्यार्थी नव्याने उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यापीठाने मंगळवारी वाणिज्य शाखेचे तीनही वर्षांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यात पहिल्या वर्षांचे ९१.२२ टक्के विद्यार्थी थिअरीमध्ये उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या वर्षाचे ८७ टक्के विद्यार्थी तर शेवटच्या वर्षाचे ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण आधीच्या निकालातील टक्केवारीच्या सरासरी १३ टक्के अधिक आहे. विद्यापीठाकडून आधी जाहीर झालेल्या निकालात वाणिज्य शाखेचे बहुतांश विद्यार्थी दोन ते तीन विषय अनुत्तीर्ण झाले होते. तब्बल १०८ विद्यार्थ्यांना इंटरनल परीक्षेत शून्य गुण देण्यात आल्याचे दिसत होते. प्रश्नपत्रिकेत चुका आढळल्यांनतर विद्यार्थ्यांनी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांना निवेदन दिले होते. निकाल लागल्यानंतरही विद्यापीठाकडून लक्ष न देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सामूहिक गुणदानाची मागणी केली होती. या समस्येवर तोडगा काढत विद्यापीठाने थिअरीच्या प्रश्नपत्रिकेतील चुका, तांत्रिक दोष दूर करत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे सुधारित निकाल जाहीर केले आहेत. यात प्रथम वर्षाचा निकाल संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. सर्व्हरच्या अडचणींमुळे द्वितीय व तृतीय वर्षांचा निकाल मंगळवारी सायंकाळपर्यंत अपलोड झाला नव्हता. हा निकालही लवकरच अपलोड करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक दीपक दलाल यांनी सांगितले.

९५.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : वाणिज्य शाखेच्या १५ हजार १८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ हजार ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवीन निकालानुसार ९५.७० टक्के निकाल लागला. परीक्षा विभागातर्फे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निकालाचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...