आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे शनिवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयाेजन करण्यात आले. मेळाव्यासाठी विविध १० कंपन्यांनी २०५९ जागा उपलब्ध केल्या होत्या. प्रत्यक्षात मेळाव्यास केवळ ७१५ रोजगारार्थींनी हजेरी लावली. त्यात हिताची अॅस्टिमो ब्रेक सिस्टम ई. प्रा. लि. बांभोरी या एकाच कंपनीने ८२ जणांना ऑफर लेटर दिले. इतर कंपन्यांनी ६१७ रोजगारार्थींची प्राथमिक निवड केल्याचा दावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केला. मेळाव्यासाठी विभागाचे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार मेळाव्यात सहभागी हाेता येणार होते; परंतु प्रत्यक्ष हजर झालेल्यांनाही मुलाखतीची संधी देण्यात आली.
दरम्यान, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे गेल्या १५ दिवसांपासून रोजगार मेळाव्याच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात वाहने फिरवली. विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले. सोशल मीडियातून प्रचार केला. तरीदेखील जेवढ्या जागा उपलब्ध होत्या तेवढेही विद्यार्थी मेळाव्याला हजर राहिले नाही. विद्यार्थ्यांनी मेळाव्याकडे पाठ का फिरवली? याचा शाेध घ्यावा लागणार आहे.
अशी आहे दुहेरी परिस्थिती
काही विद्यार्थी रोजगार मेळाव्यातून नाराज होऊन निघून गेले. काही कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखती न घेता केवळ बायोडाटा गोळा करतात. नंतर बोलावले जाईल अशी उत्तरे देतात. यामुळे जागेवर नोकरी मिळवण्यासाठी आलेल्या उमेदवारांचा हिरमोड होतो. तयारी करून आले असतानाही त्यांना मुलाखतीसाठी संधी मिळत नाही. हा मेळावा म्हणजे औपचारिकता असल्याचेही मत काही उमेदवारांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले. तर मेळाव्यात मुलाखती होतात, कंपन्या गरजेनुसार विद्यार्थ्यांनी निवड करतात. काही रोजगारार्थींना नंतर बोलावतात, अशी माहिती आयाेजकांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.