आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भटू सोनारांची २१वी वारी; अर्थकारण बिघडले तरी भक्तिकारणात रस

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विठ्ठलाच्या वारीचे वेड भक्तीमार्गातून कसे वाढत जाते याची प्रचिती अमळनेरच्या सखाराम महाराज दिंडीत आली. सोनार काम करून सहा जणांचा उदरनिर्वाह करणारे भटू आनंदा सोनार (वय ६०) हे महिनाभर दुकान कुलूपबंद ठेवतात. सुमारे ३० हजार रुपयांचा खड्डा वर्षभरात विठ्ठलच भरून काढतो असे त्यांचे मत आहे. सोनार यांचे वारीचे हे सलग २१वे वर्षे आहे. घरी सुमारे ९० वर्षे वय असलेले त्यांचे वडील, ८० वर्षांची आई व सासू अशा तिघांच्या संगाेपनाचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते दिंडीत असल्याने आता महिनाभर अंथरुणावर खिळलेल्या या तीनही वृद्धांची शुश्रूषा करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनीता यांची जबाबदारी आहे.

सुनीता यांचाही पाय आठ दिवसांपूर्वीच मोडला आहे. अशाही कठीण परिस्थितीत सोनार यांनी खंड पाडला नाही. घरची माउली म्हणजेच पत्नी सुनीता यांचा आधार असल्याने हे सारे शक्य होत असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दिंडीमुळे कुटूंबाचे अर्थकारण बिघडत असले तरी सोनारांचे भक्तिकारण मात्र निस्सीम आहे. बीएस्सी अॅग्री (रसायनशास्त्र) पर्यंत सोनार यांचे शिक्षण झाले आहे. नाेकोरीच्या अनेक संधी उपलब्ध असूनही त्यांनी वडिलांच्या सोनारी व्यवसायात हातभार लावला. तोच व्यवसाय पुढे उदरनिर्वाहासाठी निवडला. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा अमळनेरच्या दिंडीत सहभाग घेतला. दारूचे व्यसन वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भक्तिमार्ग त्यांनी अवलंबला.

त्याच दिवसापासून त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले. आता २१ वर्षे अखंडपणे ते दिंडीत पंढरपूरला जात आहेत. दिंडीचालक, सेवेकरी हे मानाचे पद त्यांच्याकडे आहे. अनेक अडचणी येत असल्या तरी अविरतपणे वारी सुरू आहे. तीस दिवस ते घरापासून दूर असतात. या काळात वृद्धांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी घराशेजारील मेडिकल दुकानदाराशी बोलणी केलेली असते. सोनार कुटूंबीयांना महिनाभर उसनवारीने औषधी पुरवल्या जातात.

अशीच व्यवस्था किराणा दुकानावरही केली आहे. घरात आई, वडील व सासू हे तीन वृद्ध आहेत. पत्नी व मुलगा दोघे त्यांची सेवा करीत आहेत. सोनार यांचा मुलगा हर्षल नुकताच बारावी पास झाला आहे. तो पुढील उच्चशिक्षणाची तयारी करतो आहे. तर मुलगी हर्षाली एमएसडब्ल्यू पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सध्या दिल्लीत एका खासगी कंपनीत नोकरी करते आहे. कुटूंबीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सोनार यांना विठ्ठलाची भक्ती करणे सहज शक्य होते आहे. त्यासाठी महिनाभर व्यवसाय बंद ठेवण्याचे त्यांचे धाडस बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...