आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या मित्राच्या ‘स्टेटस’वर झटपट कर्ज मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक पाहून व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज मिळवू इच्छिणाऱ्या तरुणाला मित्राचे ते स्टेटस खूपच महागात पडले. २३ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्यावर व्यवसाय वृद्धी तर दूरच, आत्महत्या करण्याचे विचार त्याच्या मनात यायला लागले. पण तो पोलिसांकडे गेला आणि अखेर सोमवारी त्याला पोलिसांनी जप्त केलेले १६ लाख ६० हजार रुपये परत मिळाले. शहरातील सतीश गाढे असे या फसवणूक झालेल्या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने कुरियरचा व्यवसाय सुरू केला असून आठ शहरांमध्ये त्याच्या शाखा आहेत. या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी त्याला कर्जाची आवश्यकता होती. तो पूर्वी ज्या कंपनीत नोकरी करीत होता त्याच कंपनीत महेश चव्हाण काम करीत होता. जुलै २०२२ मध्ये त्याच्या समाज माध्यमावरील स्टेटस मध्ये झटपट कर्ज मिळवण्यासाठीचा संपर्क क्रमांक सतीशने पाहिला आणि त्यावर फोन केला.
पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने तो फोन घेतला व ६० लाखांपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन त्याला दिले. दरम्यानच्या काळात खराब झालेले सिबिल दुरुस्ती , नोंदणी आणि अन्य कारणांसाठी त्याच्याकडे पैसे मागितले जात होते आणि तो ते आॅनलाइन पाठवत होता. दरम्यान, तुमची फाइल आरबीआय अधिकाऱ्यांनी पकडली. ते गुन्हा दाखल करीत आहेत, असेही त्याला सांगितले. त्यातून वाचण्यासाठी पुन्हा आठ लाख मागितले . स्वत:ची कार, आई व पत्नीचे दागिने विकून सतीश ते पैसे देत राहिला आणि त्यानंतर कर्ज नको, पण पैसे परत द्या अशी मागणी त्याने पूजाकडे केली.
त्यावेळी तिने फोन घेणे बंद केले. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ती सायबर क्राइमकडे आल्यावर त्यावर हालचाली झाल्या व पोलिसांनी पूजाच्या घरी जाऊन तिच्याकडून १६.६० लाख रुपये रोख जप्त केले. शिवाय तिच्या बँंक खात्यातील दोन लाख नऊ हजार रुपये फ्रिज करण्यात आले आहेत. तेही त्याला परत मिळू शकतात. रोख रक्कम सोमवारी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते सतीशला परत केली. सायबर शाखेचे तत्कालीन निरीक्षक लीलाधर कानडे, निरीक्षक अशोक उत्तेकर आणि तपास अधिकारी दिगंबर थोरात उपस्थित होते.
रक्कम मिळाल्याने दिलासा
कार, सोने विकून व कर्ज काढून, उसनवार पैसे घेऊन आपण ही रक्कम पूजाला दिली होती. घेणेकरी ते पैसे परत मागत होते. त्यामुळे आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात येत होते, असे सतीश गाढे याने ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला सांगितले. ही रक्कम मिळाल्याने दिलासा मिळाला, असेही त्याचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.