आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या 35 दिवसानंतर सरकारला जाग:28 हजारावर शिधाजिन्नस कीट लाभार्थ्यांना दिलेच नाहीत, आता आठवडाभरात वाटपाचे आदेश

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राज्य शासनातर्फे दिवाळीसाठी दिलेले चार शिधाजिन्नसांचे तब्बल 28 हजार 889 रेशन कीट अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गट शिधापत्रिकाधारकांना वाटपच करण्यात आले नाहीत. ते कीट रेशन दुकाने व शासकीय गोदामात पडून आहेत.

सात दिवसांमध्ये ई-पॉस मशीनवर थम्ब इंप्रेशन घेऊन लाभार्थ्यांना शिल्लक शिधाजिन्नस वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यानंतरही शिल्लक राहिल्यास त्याबाबत राज्यस्तरावरुन सूचना देण्यात येणार आहेत.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गट शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ व 1 लीटर पामतेल या शिधाजिन्नसांचा संच दिवाळीसाठी देण्यात आले. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह कंझ्युमर्स फेडरेशन मुंबईमार्फत या शिधाजिन्नस महाराष्ट्रातील शासकीय गोदामांमध्ये पोहोच करण्यात आले. दिवाळीमध्ये लाभार्थ्यांना शिधाजिन्नस कीट वाटप करणे अपेक्षित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशव्यांमुळे लाभार्थ्यांना दिवाळीमध्ये शिधाजिन्नस कीट वाटप झाल्या नाहीत.

कंत्राटदाराकडून चारही शिधाजिन्नस वेगवेगळ्या तसेच विलंबाने शासकीय गोदामात पोहोच करण्यात आल्या. तेथून रेशन दुकानात पोहोचवण्यासही विलंब झाला. रेशन दुकानदारांनी शंभर रुपये कीटप्रमाणे लाभार्थ्यांना विक्री केली. त्याबदल्यास त्यांना प्रत्येक कीटमागे ६ रुपये मार्जीन देण्यात येत आहे. उर्वरित रक्कम राज्य शासनाकडे चलनाने भरावी लागणार आहे.

शिधाजिन्नस कीट वाटप स्थिती

जिल्ह्याला प्राप्त 6 लाख 19 हजार 961, लाभार्थ्यांना वाटप 5 लाख 9182, रेशन दुकाने,गोदाम शिल्लक 28 हजार 889

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना मोफत गहू व तांदूळ देण्यात आले. त्यासाठी रेशन दुकानदारांना क्विंटलमागे 150 रुपये मार्जीन देण्यात येते. शासनाने रेशन दुकानदारांना 2021 मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे मार्जीन दिले. उर्वरित डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या पाच महिन्यांचे मार्जीन रेशन दुकानदारांना देण्यात आले नसल्याचे रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...