आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वःतच्या 'वायफाय'द्वारे द्यावे लागते ग्राहकांना रेशन:5 जी च्या काळात शासनाने नेमलेल्या कंपनीकडून ई-पॉस मशीनला 2 जी इंटरनेट

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाईव्ह जी नेटवर्कच्या जमान्यात शासनाकडून नेमण्यात आलेल्या ओयॅसीस सायबरनेटीक्स या कंपनीकडून रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीनला 2 जी नेटवर्कचे कार्ड देण्यात आले आहेत. यामुळे कव्हरेज मिळण्यास अडचणी येत आहेत. परिणामी रेशन दुकानदारांना स्वत:चे वायफाय लावून या मशीन चालवाव्या लागत आहेत. गेल्या 1 ऑगस्टपासून सर्व्हर डाऊन राहत असल्याने लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे लाभार्थी रेशन दुकानदारांवर संताप करीत आहेत.

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना शासकीय गोदामांमधून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गंत मोफत तसेच सवलतीचे असे दोन्ही प्रकारचे धान्य पोहोच करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ई-पॉस मशीनवर पात्र रेशनकार्डधारकांनी त्यांचा अंगठा उमटवल्यानंतर रेशन दुकानातून धान्य देण्यात येते.

गेल्या 1 ऑगस्टपासून ई-पॉस मशीनचे सर्व्हर सातत्याने डाऊन राहत आहे. लाभार्थ्यांनी अंगठा उमटवल्यानंतर पावती जनरेट होत नाही. तासनतास सर्व्हर डाऊन राहत असल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानात बसून रहावे लागत आहे. गुरुवारी सर्व्हर सुरळीत झाले होते.

तासाभरात पुन्हा डाऊन झाले.अशा परिस्थितीत धान्य न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना हताश होवून घरी परतावे लागत आहे. या परिस्थितीबाबत माहिती नसल्याने लाभार्थी रेशन दुकानदारांवर रोष व्यक्त करीत आहेत. रेशन दुकानदारांना शासनाने नेमलेल्या आेयॅसीस सायबरनेटीक्स या कंपनीकडून ई-पॉस मशीनचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या मशीन चालवण्यासाठी टू जी नेटवर्क असलेले कार्ड देण्यात आलेले आहे. टू जीवर नेटवर्क मिळत नसल्यानेही रेशन दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्हा पुरवठा विभाग करणार पाठपुरावा

ई-पॉस मशीनचे सर्व्हर 1 ऑगस्टपासून डाऊन आहे. गुरुवारी सुरळीत झाले होते. तासाभरात जैसे थे परिस्थिती झाली. शासनाकडून पुरवठा करण्यात आलेल्या ई-पॉस मशीनला टू जी नेटवर्क देण्यात आलेले आहे. रेशन दुकानदारांना स्वत:चे वायफाय लावून या मशीन कार्यरत कराव्या लागत आहेत. रेशन दुकानांमध्ये धान्य पडून आहे.मशीन चालत नसल्याने लाभार्थ्यांना हताश होवून परत जावे लागत आहे.ते रेशन दुकानदारांवर रोष व्यक्त करीत आहेत. त्याबाबत रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करुन सर्व्हर सुरळीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. -अनिल अडकमोल, अध्यक्ष रेशन दुकानदार संघटना

बातम्या आणखी आहेत...