आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये 3405 शाळा उद्यापासून सुरू:विद्यार्थ्यांचे होणार जल्लोषात स्वागत; पहिल्याच दिवशी मिळणार 4 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेच्या शैक्षणिक वर्षास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थी बुधवारपासून शाळेत येणार असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे याकरिता वर्ग सजावट करण्यात आली आहे. शाळांमध्ये फुगे व पताकांची सजावट केली आहे. मंगळवारी शिक्षक वर्गात व वर्गाच्या बाहेर असलेल्या फळ्यावर शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहण्यात मग्न असताना दिसले. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील 3405 शाळा बुधवारपासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

महापालिका व जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक शाळांमध्ये प्रवेशोत्सव, शाळा पूर्व तयारी कऱण्यात आली आहे. मुलांचे जंगी स्वागत करावे यासाठी काही शाळांनी गुलाबपुष्प देखील मागविले आहे. शिक्षकांनी शाळेची स्वच्छता केली असून बुधवारी पुस्तक वाटप केले जाणार आहे. त्यानुसार पुस्तकांवर शाळेचे शिक्के मारण्याचे काम झाले आहे. दरम्यान मंगळवारी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक वर्गात व वर्गाच्या बाहेर सूचना फलकांवर स्वागतपर संदेश लिहिताना दिसून आले. तसेच वर्गासमोरील स्वच्छताही केली जात होती. प्रत्येक वर्गाला तोरण बांधण्यात आलेले आहे. शाळेच्या पहिल्यादिवशी येणाऱ्या मुलांना प्रसन्न वाटले पाहिजे, तो शाळेमध्ये रमला पाहिजे या दृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली.

4 लाख विद्यार्थ्यांना मिळणार पाठयपुस्तके

स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा आणि शासकीय शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तके देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 2750 शाळांमध्ये 4 लाख 16 हजार 462 विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके वितरित केली जाणार असून बालभारतीकडून जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांना 24 लाख 6 हजार 677 पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...