आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हुतात्माचे ३५०, सुरत पॅसेंजरचे ३०० सीट १३ ते १६ ऑगस्टला उपलब्ध

जळगाव/भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १३ ते १६ ऑगस्टदरम्यान शासकीय कार्यालयांना सुटी आहे. त्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे. या काळात लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळणे कठीण आहे; मात्र याच काळात भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचे ३५० सीट, तर रात्रीच्या भुसावळ-सुरत पॅसेंजरचेही ३०० सीट रिकामे आहेत. त्यामुळे सुटीच्या काळात कल्याण, पुणे आणि सुरतला जाणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकते. १३ ऑगस्टला दुसरा शनिवार, १४ रोजी रविवार, १५ रोजी स्वातंत्र्य दिन आणि १६ रोजी पारसी नववर्ष असल्याने सलग चार सुट्या आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी पावसाळी पर्यटनाचे नियोजन केले आहे. मात्र रेल्वे गाड्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. परिणामी कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची प्रतीक्षायादी वाढते. काही गाड्यांना नाे-रूम दर्शवला जात आहे. यामुळे पर्यटनासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, नाशिक, कल्याणमार्गे पुण्याकडे जाणारी हुतात्मा एक्स्प्रेस, तर सुरत पॅसेंजरही प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल असते. मात्र, १३ ते १६ दरम्यान दोन्ही गाड्यांमध्ये अनेक सीट रिकामे आहेत.

दिवसनिहाय उपलब्ध सीटची आकडेवारी अशी
भुसावळ येथून रात्री ८.३० वाजता सुटणाऱ्या भुसावळ-सुरत पॅसेंजरला आरक्षण डबे जोडले आहेत. या गाडीला १४, १५ व १६ आॅगस्ट रोजी ३०० सीट अद्याप रिकामे आहेत. तसेच भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या गाडीलाही १४ रोजी ५०, १५ रोडी ३००, १६ रोजी ३०० तर दि. १७ रोजी ३५० सीट ऑनलाइन रिकामे दर्शवले जात आहेत. कुशीनगर, पवन, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये वेळेवर तिकीट कन्फर्म हाेण्याची शक्यता आहे.

लांब पल्ल्याच्या या गाड्यांना नाे-रूम
गर्दीच्या हंगामात मंगला एक्स्प्रेस १४ व १५ रोजी नाे-रूम दर्शवत आहे, पठाणकाेट एक्स्प्रेसला १४ ते १६ या काळात नाे-रूम आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये महाराष्ट्र एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेसला नो-रुम आहे. तर गीतांजली आणि सेवाग्रामला १४ ते १६ दरम्यान नाे-रूम, तसेच मंगला एक्स्प्रेस सुरत मार्गावरील नवजीवन एक्स्प्रेसलाही नाे-रूम दर्शवला जात आहे.

विदर्भ, महाराष्ट्रसह या गाड्यांना प्रतीक्षा यादी
१३ ते १६ या सुटीच्या काळात अमरावती-मुंबई या गाडीला ५५ वेटिंग आहे. विर्दभ एक्स्प्रेस ४३, पंजाब मेल ३३, हावडा मेल ८८, आझाद हिंद एक्स्प्रेस १११, महाराष्ट्र एक्स्प्रेस १२४, पवन एक्स्प्रेसला ५०, कुशीनगर ७७, गीतांजली १२६, तर पुष्पक एक्स्प्रेसला ६१ वेटिंग आहे. अहमदाबाद- हावडा ८०, कर्नाटक एक्स्प्रेस ६६, संचखंड ९०, गाेवा ११२, ताप्ती गंगा एक्स्प्रेसला ४० वेटिंग आहे. त्यामुळे या गाड्यांचे कन्फर्म तिकीट दुरापास्त आहे.

तिकीट काढूनच करा प्रवास : पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांनी ज्या गाडीत सीट रिकामे आहेत, त्यांची तिकिटे काढून घ्यावी; मात्र जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास करू नये. रेल्वेच्या विशेष तपासणी पथकाला, नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास नियम माेडणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
शिवराज मानसपुरे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...