आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता:दूध संघाने संचालकांच्या कुटुंबांशी संबंधित ३६ काेटींची बिले राेखली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघात आधीच्या संचालक मंडळाने आॅक्टाेबर महिन्यात बैठक घेऊन मंजुरी दिलेली ३६ काेटी रुपयांची बिले नवीन संचालक मंडळाने थांबवली आहेत. त्यातील बहुतांश बिले ही आजी-माजी संचालकांच्या नातेवाईक, स्वकीयांशी संबंधित असल्याने अडचणी वाढू नये म्हणून संचालक मंडळाने सावध पवित्रा घेत ही बिले थांबवली असल्याचे समेार आले आहे.

जिल्हा दूध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने २७ आॅक्टाेबर २०२२ राेजी बैठक घेतली हाेती. या बैठकीत ३६ काेटी २९ लाख रुपयांच्या विविध बिलांना मंजुरी देण्यात आली हाेती. या बैठकीला केवळ नऊ संचालक उपस्थित असल्याने संचालक मंडळाचा काेरम पूर्ण नव्हता. दरम्यान, या बिलांमधील सर्वाधिक रक्कम काही आजी-माजी संचालकांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक यांच्या नावे असलेल्या एजन्सीची आहेत. २७ आॅक्टाेबर राेजी झालेल्या बैठकीत ज्या विषयांना मंजुरी देण्यात आली हाेती. त्या बैठकीचे इतिवृत्त २४ डिसेंबर राेजी झालेल्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले हाेते.

या संचालक मंडळाने आधीच्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर केले तर त्या बिलांसाठी नवीन संचालक मंडळाला जबाबदार धरले गेले असते. संचालकांच्या कुटुंबीयांची बिले काढल्याने नियमानुसार अपात्र ठरण्याच्या तसेच जबाबदारी निश्चित हाेण्याच्या अडचणी वाढू नये म्हणून दूध संघाच्या नवीन संचालक मंडळाने सावध पवित्रा घेत या बिलांना ब्रेक लावला आहे.

एकमेकांना हाेते आहे विचारणा
दूध संघाच्या बैठकीत हा विषय समाेर आल्यानंतर ही ३६ काेटींची बिले नेमकी काेणत्या संचालकांच्या नातेवाइकांची आहेत? या संदर्भात विचारणा आता एकमेकांना हाेऊ लागली आहे. अर्थात, काही जणांच्या अडचणी वाढतील.

पुढे काय? : अपात्रतेची आहे धास्ती
दूध संघात कुटुंबीय, नातेवाइकांच्या नावे कंत्राट घेणाऱ्या संचालकांची बिले थांबवण्यात आली आहेत. संचालकांनी त्यांच्या कुटुंबीयांचे किंवा नातेवाइकांच्या नावे दूध संघात कंत्राट घेणे हे कृत्य दूध संघाच्या पाेटनियमाप्रमाणे संचालकांच्या अपात्रतेसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ही बिले थांबली असतानाही हे संचालक शांत आहेत.

निर्णय : बैठक ठरवली बेकायदेशीर
आधीच्या संचालकांनी आॅक्टाेबरमध्ये घेतलेल्या बैठकीला नऊ संचालक उपस्थित असल्याने पाेटनियमाप्रमाणे काेरम पूर्ण नव्हता. दूध संघाच्या पाेटनियमाप्रमाणे २० संचालकांपैकी किमान ११ संचालक काेरमपूर्तीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे ही बैठक बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करीत या बैठकीचे इतिवृत्त नामंजूर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...